मीरारोड: मीरा भाईंदरमधील सुमारे 1200 जणांना आज रेल्वेने राजस्थानला पाठवण्यात आले. पहिल्यांदाच ट्रेनने रवाना केले गेले. भाईंदरमधून 40 बसने वसई रेल्वे स्थानकात सर्वाना नेण्यात आले. या सर्व प्रवाश्यांचा खर्च मुख्यमंत्री सहाय्य्यता निधीतून केला गेला आहे . राजस्थानला रेल्वे जाणार असल्याचे संदेश व्हॉट्सअॅपवर व्हायरल होताच अगदी मुंबईतूनसुद्धा लोकं आली होती.
मीरा भाईंदरमधून राजस्थानला जाऊ इच्छिणाऱ्या मजूर व अन्य कामगार आदी लोकांना आता पर्यंत बस ने पाठवले जात होते. परंतु बसमध्ये खूपच कमी संख्येने प्रवासी जात असल्याने राजस्थानसाठी ट्रेन सोडण्याची मागणी आमदार गीता जैन यांनी केली होती. राजस्थानला जाणाऱ्या लोकांची यादी देखील तयार केली गेली होती. राजस्थान सरकारकडून रेल्वेने मीरा भाईंदरमधून लोकांना नेण्याची परवानगी मिळावी त्यासाठी गीता जैन यांनी पाठपुरावा चालवला होता .
आज मंगळवारी रेल्वेने जाणाऱ्या लोकांना भाईंदरच्या जेसलपार्क खाडी किनारी मैदानात बोलावण्यात आले होते. प्रत्येकाची तपासणी करून पालिकेच्या 40 बस मधून वसई रेल्वे स्थानकात नेण्यात आले. प्रवाश्यांमध्ये महिला, मुलांची संख्या पण बरीच होती. उपविभागीय अधिकारी अविनाश शिंदे, पालिका आयुक्त चंद्रकांत डांगे, आमदार गीता जैन,अपर तहसीलदार नंदकुमार देशमुख, मंडळ अधिकारी दीपक अनारे आदी उपस्थित होते . महसूल विभाग मार्फत लोकांना जेवणाची पाकिटे आदी साहित्य वाटप करण्यात आले. महसूल विभागाने रेल्वेच्या या सर्व प्रवाश्यांचे भाडे भरून तिकीट काढले.
यावेळी पोलीस बंदोबस्त मोठा ठेवण्यात आला होता. अपर पोलीस अधीक्षक संजयकुमार पाटील, उपअधीक्षक शशिकांत भोसले, वरिष्ठ निरीक्षक प्रकाश बिराजदार, निरीक्षक संपत पाटील आदी उपस्थित होते. जेसलपार्क येथून लोकांना ट्रेनने राजस्थान साठी नेणार असल्याचा मॅसेज व्हॉट्सअॅपवर पसरवण्यात आल्याने मीरा भाईंदरच नव्हे तर अगदी मुंबई उपनगरातून लोकं गोळा झाली होती. परंतु यादीतील नावा नुसारच लोकांना घेण्यात आले. बाकीच्यांना परत पाठवण्यात आले.
भाईंदर वरून ट्रेन सोडण्यास रेल्वेचा नकार
मीरा भाईंदरमधून मोठ्या संख्येने परराज्यात जाणारे मजूर, कामगार व लोकं असून भाईंदर रेल्वे स्थानकातून ट्रेन सोडण्याची मागणी केली जात होती परंतु भाईंदर स्थानकातील फलाट लांबीला कमी असल्याने रेल्वेने नकार दिला. त्यामुळे लोकांना बसमधून वसईला नेऊन सोडावे लागत आहे.