मीरारोड- एकाच कुटुंबातील मात्र रक्तगट जुळत नसल्याने किडनी देण्याची तयारी असून देखील प्रत्यारोपण करण्यात अडचण येत होती. मीरारोडच्या एका खाजगी रुग्णालयात पहिल्यांदाच एबीओ विसंगत स्वॅप किडनी ट्रान्सप्लांटची एकाचवेळी चौघांवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.
मीरारोडच्या वोक्हार्ट रुग्णालयातील नेफ्रॉलॉजिस्ट, युरोलॉजिस्ट आणि ट्रान्सप्लांट सर्जन डॉ. पुनीत भुवानिया यांच्या नेतृत्वाखाली ट्रान्सप्लांट सर्जन डॉ. जयेश धाबलिया, युरोलॉजिस्ट, ट्रान्सप्लांट आणि रोबोटिक सर्जन डॉ. प्रदीप व्यावहारे व डॉ. प्रकाश तेजवाणी आणि युरोलॉजिस्ट, एंड्रोलॉजिस्ट आणि रेनल ट्रांसप्लांट सर्जन डॉ. आशुतोष बागेल व त्यांच्या टीम ने पहिल्या स्वॅप किडनी ट्रान्सप्लांटची शस्त्रक्रिया यशस्वीपणे केली.
या प्रक्रियेत दोन रक्तगट जुळत नसलेल्या नातलगांचा समावेश होता. एका कुटुंबातील ५२ वर्षीय पत्नी आणि ५८ वर्षीय पती तर दुसऱ्या कुटुंबात ५६ वर्षीय आणि आणि तिची ३० वर्षीय मुलगी होते. पती आणि मुलीला किडनीची गरज होती. आणि पत्नी आपल्या पतीस तर आई आपल्या मुलीस किडनी देऊ इच्छित असून देखील रक्तगट जुळत नसल्याने किडनी प्रत्यारोपण होत नव्हते.
किडनी-पेअर्ड डोनेशनद्वारे या जोडप्यांची देवाणघेवाण करण्यात आली. पहिल्या कुटुंबातील पत्नीने दुसऱ्या कुटुंबातील मुलीला किडनी दिली, तर दुसऱ्या कुटुंबातील आईने पहिल्या कुटुंबातील पत्नीच्या पतीला किडनी दिली. सर्व चार व्यक्तींवर एकाच वेळी शस्त्रक्रिया पार पाडण्यासाठी चार ऑपरेशन थिएटर्समध्ये समन्वय साधावा लागला. डॉक्टरांच्या टीमने कोणत्याही गुंतागुंतीशिवाय शस्त्रक्रिया यशस्वी केली. सर्व चारही जणांची प्रकृती चांगली असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
किडनी विकाराने त्रस्त असलेल्या दोन्ही व्यक्तींचा भविष्यातील डायलिसिसचा खर्चही टळणार आहे. या प्रक्रियेत अचूकता, नाविन्य आणि टीमवर्क महत्वाचे होते. टर्मिनल स्टेज रिनल डिसीज असलेल्या रुग्णांचे जीवन बदलू शकते.
डॉ. पुनीत भुवानिया : स्वॅप किडनी ट्रान्सप्लांट ही अनेक रुग्ण व त्यांच्या कुटुंबियांसाठी आशेचा किरण आहे. रक्तगट मिसमॅचमुळे ट्रान्सप्लांटसाठी अपात्र ठरणाऱ्या रुग्णांसाठी ही पद्धत खूप फायदेशीर ठरते. त्यामुळे लिव्हिंग डोनर पूल वाढतो आणि रुग्णांना डायलिसिसविना निरोगी जीवन जगण्याची संधी मिळते. यशस्वी ट्रान्सप्लांट्समागे केवळ शस्त्रक्रिया नसून, दीर्घकालीन आरोग्य सेवा आणि पाठपुरावा यावर आमचा भर राहिला आहे.