राजू ओढेठाणे : नोटाबंदीनंतर गतवर्षी पालघर जिल्ह्यातील नालासोपारा येथून शिवसेनेच्या नगरसेवकाजवळून जप्त केलेली सुमारे सव्वा कोटी रुपयांची रोकड बेनामी मालमत्ता म्हणून जप्त करण्यात आली आहे. बेनामी मालमत्ता प्रतिबंधक कायद्यांतर्गत ही देशातील पहिली कारवाई असावी, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.पोलीस आणि प्राप्तिकर विभागाच्या ठाण्यातील अधिकाºयांनी १५ डिसेंबर २0१६ ला संयुक्त कारवाई करून नालासोपारा (पूर्व) येथील प्रगतीनगर नाक्याजवळ एका कारमधून एक कोटी ११ लाख १५ हजार ५00 रुपयांची रोकड हस्तगत केली होती. वसई-विरार महानगरपालिकेतील शिवसेनेचे नगरसेवक धनंजय गावडे आणि सुदर्शन आनंद शेरेगर यांच्या कारमधून हस्तगत केलेल्या या रोकडमध्ये नवीन दोन हजार रुपयांच्या नोटांच्या स्वरूपात तब्बल ४७ लाख रुपये होते. नोव्हेंबर २0१६ मध्ये केंद्र सरकारने नोटाबंदीची घोषणा केल्यानंतर अवघ्या महिनाभरात नवीन नोटा एवढ्या मोठ्या प्रमाणात मिळाल्याने खळबळ उडाली होती.प्राप्तिकर विभागाच्या ठाण्यातील सहाय्यक संचालकांनी धनंजय गावडे आणि सुदर्शन शेरेगर यांचे जबाब नोंदविले. या रोकडबाबत आपणास काहीही माहित नसल्याचा जबाब दोघांनीही नोंदविला होता. सविस्तर चौकशीअंती दोघांच्याही जबाबात तफावत आढळली होती. मात्र विरार (पूर्व) येथील मनवेलपाड्यातील प्रमोद मुकुंद दळवी यांच्याकडून ही रोकड घेतल्याचे दोघांच्याही जबाबातून समोर आले होते. त्यानुसार प्रमोद दळवी यांचा जबाब नोंदविण्यात आला. त्यांनी ही रोकड आपणच धनंजय गावडे आणि सुदर्शन शेरेगर यांना दिली असल्याचे मान्य केले. मात्र आपणास ही रोकड एका अज्ञात व्यक्तिकडून मिळाली होती, असेही दळवी यांनी जबाबामध्ये सांगितले. प्राप्तिकर विभागाच्या सक्षम प्राधिकरणासमोर हे प्रकरण सादर करण्यात आले. धनंजय गावडे, सुदर्शन शेरेगर, प्रमोद दळवी आणि दळवी यांना रोकड देणारी अज्ञात व्यक्ती यांनी काहीतरी ‘सेटिंग’ केल्याचे स्पष्ट मत प्राधिकरणाने नोंदविले. त्यामुळे बेनामी मालमत्ता व्यवहार प्रतिबंधक कायदा १९८८ अन्वये ही रोकड बेनामी जाहीर करून ती जप्त करण्याचे आदेश प्राधिकरणाने १७ आॅक्टोबरला दिले.
बेनामी मालमत्तेची पहिली कारवाई!, शिवसेनेच्या नगरसेवकाचे सव्वा कोटी जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2017 12:22 AM