जान्हवी मोर्ये, ठाणेसोलापूर येथे २७ ते २९ नोव्हेंबर या कालावधीत आयोजित अखिल भारतीय बाल नाट्य संमेलन हे प्रथमच होत आहे. अशा प्रकारचे बालनाट्य संमेलन या पूर्वी कधी झाले नव्हते. त्यामुळे या बालनाट्य संमेलनास वेगळे महत्त्व आहे. तसेच स्वागत समारंभ सोडला तर सूत्रसंचालनापासून सगळा कार्यक्रम बाल कलाकार सादर करणार आहेत. हेच या नाट्यसंमेलनाचे वेगळेपण असल्याची माहिती अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या डोंबिवली शाखेचे अध्यक्ष दिलीप गुजर यांनी दिली. बालनाट्य संमेलन भरविण्याचा यापूर्वी मुंबई शाखेने प्रयत्न केला होता. पण तो यशस्वी ठरला नाही. नाट्य परीषदेचे अध्यक्ष मोहन जोशी व प्रमुख कार्यवाहक दीपक करंजीकर यांच्या पुढाकाराने हे संमेलन सोलापूरात घेतले जाणार आहे. संमेलन सोलापुरात का आयोजित केले असा प्रश्न उपस्थित केला जात असला तरी राज्यभरातील विविध साहित्य शाखांमधून संमेलन आयोजनाचा पुढाकार घेतला जातो. मात्र, यावेळी राज्यात काही गावांमध्ये दुष्काळाचे सावट असल्याने सोलापूर शाखेने घेतलेल्या पुढाकाराला पसंती देण्यात आली. संमेलनाचे स्वागताध्यक्षपद आमदार प्रणिती शिंदे यांना देण्यात आले आहे. हे संमेलन व्हावे यासाठी दोन वर्षापासून प्रयत्न सुरु होते. कांचन सोनटक्के यांच्या अध्यक्षतेखाली ते भरत आहे. लिटील थिएटरच्या सुधा करमरकर यांनी बालनाट्य शिबीरे भरविण्यास सुरूवात केली होती. त्यांची परंपरा पुढे सई परांजपे यांनी चालविली. बालनाट्याचा महिमा इतका मोठा आहे की, बालनाट्य शिबीरातूनच दिवंगत ज्येष्ठ ख्यातनाम नट काशिनाथ घाणेकर यांची जडणघडण झाली. भक्ती बर्वे, लक्ष्मीकांत बेर्डे हे कलाकार घडले. नावारूपाला आले. त्यांनी कलेच्या क्षेत्रात योगदान दिले.
पहिल्या आगळ््या बालनाट्य संमेलनाची मेजवानी
By admin | Published: November 25, 2015 1:46 AM