- नितीन पंडित
भिवंडी : भिवंडीतील भाजपचे खासदार कपिल पाटील (Kapil Patil) यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश झाला आहे. राष्ट्रपती भवनात संपन्न झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात त्यांनी राज्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यामुळे ठाणे जिल्ह्याला प्रथमच केंद्रीय मंत्रिमंडळात संधी मिळाली आहे. मुंबईत नारायण राणे यांना तर ठाणे जिल्ह्यात कपिल पाटील यांना मंत्री करण्यामागे येत्या महापालिका निवडणुकीत शिवसेनेला नामोहरम करण्याकरिता बळ देण्याची भाजपची रणनीती आहे. नवी मुंबई विमानतळाला शेकापचे दिवंगत नेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्यावरून आगरी समाज आक्रमक झाला असताना पाटील यांना मंत्री करण्यामागे आगरी मतांचे ध्रुवीकरण करणे हाही हेतू स्पष्ट दिसत आहे.राज्यात विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेना-भाजप यांच्यात झालेल्या फारकतीमुळे ठाणे जिल्ह्यातील शिवसेनेचे प्राबल्य कमी करण्यासाठी भाजप पक्षश्रेष्ठींकडून खा. पाटील यांना संधी दिली गेली आहे. ठाणे जिल्ह्यातील महापालिका निवडणुकीत पाटील यांना राज्याचे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांचा राजकीय व आर्थिक सामना करावा लागेल. पाटील हे भिवंडी लोकसभा मतदारसंघातून दोन वेळा भाजपच्या तिकिटावर निवडून आले आहेत. यापूर्वी ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते. ठाणे शहरात व अन्य काही शहरात भाजपकडे आश्वासक चेहरा नाही. पाटील ती गरज पूर्ण करतील, अशी पक्षाची अपेक्षा आहे.ठाणे जिल्हा रामभाऊ म्हाळगी, रामभाऊ कापसे यांच्यापासून भाजपचा बालेकिल्ला राहिला आहे. मात्र या जिल्ह्याला केंद्रात संधी मिळाली नाही. कालांतराने भाजपकडून शिवसेनेने ठाणे जिल्हा हिसकावून घेतला व अगोदर आनंद दिघे यांच्या नेतृत्वात तर सध्या एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेनेचे जिल्ह्यातील अनेक शहरांमध्ये वर्चस्व आहे. मुंबईतील सेनेचे वर्चस्व मोडून काढण्याकरिता नारायण राणे यांना तर ठाणे जिल्ह्यातील सेनेच्या सत्तेला आव्हान देण्याकरिता कपिल पाटील यांना संधी देण्याचे धोरण पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांनी स्वीकारल्याचे बोलले जाते. जर या दोघांचा समावेश केंद्रीय मंत्रिमंडळात झाला तर सध्याच्या पुन्हा शिवसेना-भाजप युतीच्या चर्चा वावड्या असल्याचे सिद्ध होईल, असे बोलले जाते. पाटील यांनी सातत्याने शिंदे पिता-पुत्रांच्या विरोधात भूमिका घेतली आहे.
शिवसेना विरुद्ध आगरी संघर्ष तीव्र हाेणारपाटील हे आगरी समाजाचे असून नवी मुंबई विमानतळाला स्व. दि. बा. पाटील यांचे नाव देण्याच्या मागणीवरून आगरी समाज विरुद्ध शिवसेना संघर्ष सुरू आहे. या नामकरणाच्या वादात रायगड जिल्ह्यातील भाजपचे नेते अग्रणी आहेत हे सर्वश्रुत आहे. त्यामुळे पाटील यांचे नेतृत्व उभे करून ठाणे जिल्ह्यात शिवसेना विरुद्ध आगरी संघर्ष अधिक तीव्र करण्याची भाजपची रणनीती दिसत आहे.