लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : भंडारा येथे झालेल्या आग दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर शहरातील सर्व रुग्णालयांची अग्निसुरक्षा यंत्रणा तपासण्याचे आदेश ठाणे महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी दिले होते. त्यानुसार बुधवारपासून अग्निशमन दलाने ही तपासणी सुरू केली. त्यानुसार पहिल्या दिवशी याअंतर्गत ५० रुग्णालयांची तपासणी करून त्यांना येत्या ३० दिवसांत सक्षम आरोग्य यंत्रणा उभारण्याच्या सूचना यावेळी करण्यात आल्या,
ठाणे महानगरपालिका हद्दीत आजघडीला एकूण ३४७ खासगी तर महापालिकेची २६ आरोग्य केंद्रे, कळवा येथील महापालिकेच्या मालकीचे छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय, जिल्हा शासकीय रुग्णालय अशी एकूण ३७६ रुग्णालये आहेत. अग्निशामक दलाचे पथक प्रत्येक रुग्णालयात जाऊन तेथील सुरक्षायंत्रणेची तपासणी करणार आहेत. पहिल्या दिवशी या पथकांनी शहरातील ५० रुग्णालयांची तपासणी केली. यापूर्वी एप्रिल २०१८ मध्ये सपन श्रीवास्तव यांनी ठाणे पालिका हद्दीत अनेक रुग्णालयांमध्ये अग्निसुरक्षेचे नियम पाळले जात नसल्याचा आरोप करून मुंबई उच्च न्यायालयात याचिका सादर केली होती. यावर त्यावेळी न्यायमूर्ती नरेश पाटील आणि न्यायमूर्ती अनुजा प्रभूदेसाई यांच्या खंडपीठाने ठाण्यातील रुग्णालयांमध्ये अग्निसुरक्षेची पाहणी करून सर्वेक्षणाचे आदेश दिले होते. परंतु नुकत्याच भंडारा येथे रुग्णालयात झालेल्या आगीच्या घटनेनंतर ठाणे अग्निशामक दलाने पुन्हा आपल्या हद्दीतील रुग्णालयांची अग्निसुरक्षा यंत्रणा तपासणी करण्यास सुरुवात केली आहे.
अनेक रुग्णालये दाटीवाटीच्या वस्तीतमहापालिका हद्दीत अनेक रुग्णालये दाटीवाटीने उभ्या असलेल्या इमारतीत आहेत. जिथे अनेक ठिकाणी नियमांकडे दुर्लक्ष करून कारभार चालवला जातो. आता या तपासणी मोहिमेनंतर सर्वच रुग्णालय प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे. त्यानुसार या रुग्णालयांना तपासणीनंतर अग्निशमन दलाने केलेल्या सूचनेनुसार ३० दिवसांत त्यांच्या येथील अग्निसुरक्षा यंत्रणा सक्षम करावी लागणार आहे. तशा प्रकारची दुरुस्ती न केल्यास संबंधित रुग्णालयांवर कारवाई करण्यात येईल.
रुग्णालयांनी अग्निशमन यंत्रणा करावी सक्षमयाबाबत अग्निशमन दलाचे प्रमुख गिरीश झळके यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, आयुक्तांच्या आदेशानुसार आम्ही रुग्णालयांची अग्निसुरक्षा यंत्रणा तपासणीस बुधवारपासून सुरुवात केली. बुधवारी पहिल्या दिवशी ५० रुग्णालयांची तपासणी केली असून गुरुवारीही मोहीम सुरू होती. आम्ही प्रत्येक रुग्णालयाला त्यांची यंत्रणा सक्षम करण्यास ३० दिवसांची मुदत दिली असल्याचे त्यांनी सांगितले.