लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यात ठाणे महापालिकेच्या १५ केंद्रांवर पहिल्या टप्प्यातील दुसरा डोस घेणारे आणि दुसऱ्या टप्प्यातील पहिला डोस घेणारे ज्येष्ठ नागरिक अशा १००५ नागरिकांनी सोमवारी दिवसभरात लस घेतली. त्यामध्ये ४५ ते ६० वर्षांवरील ४४० नागरिकांचा समावेश आहे. तर, जिल्हा शासकीय रुग्णालयात २२१ जणांनी लस घेतली आहे. पालिकेच्या केंद्रांवर आणि जिल्हा शासकीय रुग्णालयात लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरू झाला असला तरी शहरातील खासगी रुग्णालयांमध्ये केंद्र शासनाच्या अंमलबजावणीतील गोंधळामुळे दुसऱ्या दिवशीही लसीकरण सुरू होऊ शकले नाही.
कोरोना लसीकरणाचा दुसरा टप्पा १ मार्चपासून केंद्र शासनाने सुरू केला. त्यामध्ये शासकीय तसेच खासगी रुग्णालयांमध्ये लसीकरण करण्यात येणार असल्याचे जाहीर केले होते. प्रत्यक्षात अंमलबजावणीतील गोंधळ आणि संभ्रमामुळे पहिल्याच दिवशी लसीच्या प्रतीक्षेत असलेल्या अनेकांच्या पदरी निराशा पडली. कोविन-२ या संकेतस्थळावर नावनोंदणी करताना अडचणी येत असल्याने अनेकांना लस घेणे शक्य झाले नव्हते. दुपारनंतर मात्र संकेतस्थळावरील तांत्रिक अडचणी दूर होऊन लसीकरण सुरू झाले. ठाणे महापालिकेच्या १५ केंद्रांवर लसीकरण मोहीम सुरू झाली आहे. त्यामध्ये ४५ ते ६० वर्षांपर्यंतचे सहव्याधी, आरोग्य सेवक, विविध व्याधीग्रस्त नागरिक आणि नोंदणी झालेली नसलेले आरोग्य कर्मचारी या सर्वांचे लसीकरण करण्यात येत आहे. सोमवारी दिवसभरात एकूण १००५ जणांनी लस घेतली. ४५ ते ६० वर्षांपर्यंत सहव्याधी आणि ६० वर्षांपुढील ज्येष्ठ नागरिक अशा ४४० नागरिकांना लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे. तर, जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये संकेतस्थळावर नोंदणी केलेल्या २२१ जणांना लस दिली.
............
ठाणे महापालिका हद्दीत सोमवारपासून लसीकरणाला सुरुवात झाली आहे. खासगी रुग्णालयांच्या यादीमध्ये पाच रुग्णालयांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये ज्युपिटर, वेदांत, न्यू होरायझन, काळसेकर, बेथनी या रुग्णालयांचा समावेश आहे. त्यांची नोंदणी प्रक्रिया सुरू असून लवकरच या खासगी रुग्णालयातही लसीकरण सुरू होणार आहे.
- संदीप माळवी, उपायुक्त, ठामपा
...........
वाचली