कोरोनाचे भय कायम असतानाच तब्बल अडीच महिन्यांनंतर, शुक्रवारी ठाणे जिल्ह्यात दुकाने उघडल्याने नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर विविध वस्तू, जिन्नस खरेदीसाठी गर्दी केली. मात्र, समविषम तारखांनुसार दुकाने उघडण्याचा नियम असतानाही काही ठिकाणी सरसकट दुकाने उघडण्यात आली. ठाणे महापालिकेच्या आदेशामुळे दुकानदारांमध्ये गोंधळ आणि संभ्रम असल्याचे पाहायला मिळाले.
अखेर, महापालिका प्रशासन, पोलीस आणि व्यापाऱ्यांमध्ये बैठक झाल्यानंतर सुधारित आदेश काढण्यात आला असून, त्यानुसार शनिवारपासून दुकाने उघडली जाणार आहेत. कल्याणमध्ये काहीअंशी समविषमच्या नियमांचे पालन केले गेले. मात्र, डोंबिवलीत सरसकट सर्व दुकाने उघडली होती. होलसेल मार्केट असलेल्या उल्हासनगरमधील दुकानांमध्ये नागरिकांनी खरेदीसाठी गर्दी केल्याने सोशल डिस्टन्सिंगचा पार फज्जा उडाला होता.प्रतिबंधित क्षेत्र वगळता शुक्रवारपासून शहरातील प्रमुख बाजारपेठा खुल्या झाल्या. दुकानदारांनी साफसफाई करून दुकाने ग्राहकांच्या सेवेसाठी खुली केली. परंतु, सोशल डिस्टन्सिंगचे पालन ग्राहकांकडून होताना दिसले नाही. पहिल्याच दिवशी स्टेशनरी, पुस्तके आणि रेनकोट, छत्र्यांच्या दुकानांमध्ये गर्दी दिसली. शुक्रवारी वटपौर्णिमा असल्याने अनेक महिलांनी आपल्या पतीसमवेत वाणाचे सामान घेण्यासाठी जांभळीनाका, स्टेशन परिसरात गर्दी केल्याचे दिसून आले.
येथे गस्तीवर असलेल्या ठाणेनगर वाहतूक पोलिसांनी दुचाकीवरून आलेल्या दोघांच्या विरोधात कारवाई करून अनेक दुचाकी जप्त केल्या होत्या. काहींना दंडही ठोठावला. दुचाकीवरून एकालाच जाणे बंधनकारक असतानाही दोघे जण तेही विनाहेल्मेट जात असल्यानेही ही कारवाई करण्यात आली. दुसरीकडे पुस्तकांच्या दुकानांमधून वह्या, पुस्तके घेण्यासाठी गर्दी झाली होती.
काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर कोरोनामुळे वह्या, पुस्तकांची छपाई थांबली असल्याचे मेसेज फिरत होते. त्यामुळेच ही गर्दी या दुकानांमधून झाल्याचे दिसून आले. त्यामुळे पोलिसांनी काही वेळेतच ती बंद केली. परंतु, भाजी मार्केटमध्ये मात्र फारशी गर्दी दिसली नाही. शहरातील इतर भागांतील दुकानेदेखील समविषम तारखांनुसार सुरू झाल्याचे दिसले. तर, अनेकांनी पावसाळी रेनकोट आणि छत्र्या घेण्यासाठी दुकानांमध्ये गर्दी केली होती. यामध्ये केवळ नागरिकांनी तोंडाला मास्क लावण्याची तेवढी खबरदारी घेतल्याचे दिसले.