ठाणे : ऐरोली- कळवा एलिव्हेटेड पुलाच्या निर्माणामध्ये बाधित होणाऱ्या ठाणे आणि नवी मुंबईच्या वेशीवरील मुख्य मार्गिकेतील भोलानगर परिसरात सध्या एमआरव्हीसीकडून घरांच्या सर्वेक्षणाचे काम सुरू आहे. मूळ सर्व्हे ९५० घरांपैकी केवळ बाधित होणाऱ्या ४५० घरांचा ताबा घेण्यात येणार असून, उर्वरित घरांना रेल्वेच्या तीन ट्रॅकवर (पटरी) राहावे लागणार असल्याने स्थानिकांनी या सर्व्हेला विरोध केला आहे. याबाबत त्यांनी गृहनिर्माणमंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्याकडे धाव घेतली होती.
त्यानुसार रविवारी आव्हाड यांनी भोलानगर येथील बाधित होणाऱ्या नागरिकांची भेट घेऊन जोपर्यंत घरांची पुनवर्सन प्रक्रिया होणार नाही, तोपर्यंत कोणत्याही घराला हात लावू देणार नाही, असा इशारा एमआरव्हीसी आणि एमएमआरडीएला दिला. वेळप्रसंगी नागरिकांच्या घरांसाठी आपण मंत्रीपद बाजूला ठेवून रस्त्यावर उतरणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
एलिव्हेटेड पुलाची उभारणी करत असताना बाधित होणाऱ्या मुख्य मार्गिकेतील भोलानगर हा परिसरात येतो. या परिसराचा एमआरव्हीसीने स्पार्क संस्थेच्या माध्यमातून घरांच्या सर्व्हेचे काम सध्या सुरू केले आहे. या आधी झालेल्या दोन सर्व्हेनंतर तिसरा सर्व्हे झालेल्या घरांचे एमएमआरडीए आणि एमआरव्हीसी या घरांचे क्षेत्र अधिग्रहित करून एलिव्हेटेड पुलांच्या कामाला सुरुवात करणार आहे; परंतु येथील स्थानिक नागरिकांनी हा सर्व्हे चुकीच्या पद्धतीने झाल्याचा आरोप करून तीन रेल्वे ट्रॅकमध्ये राहणाऱ्या नागरिकांचे सरसकट पुनर्वसन करण्याची मागणी करून घरांचा सर्व्हे बंद पाडला आहे. यानंतर आव्हाड यांनी एमआरव्हीसी आणि एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांशी फोनवर संपर्क साधून जोपर्यंत बाधित होणाऱ्या नागरिकांना घरे कुठे देणार? किती फुटांचे देणार? याबाबत लेखी आश्वासान दिले जात नाही. तोपर्यंत सर्व्हे आणि पुनवर्सन प्रक्रिया सुरू करू नये, असे सक्त आदेश दिले.
आजपर्यंत या ठिकाणी एलिव्हेटेड मार्गाचे तीन सर्व्हे झाले आहेत; परंतु ते करीत असताना एमआयव्हीसीने नेमलेल्या स्पार्क संस्थेचा गलथान कारभार पुढे आला आहे. सध्याचा तिसरा सर्व्हे रद्द करून परिसरातील मोकळ्या जागेवर न्यू शिवाजीनगरमार्गे कळवा रेल्वेस्थानकाकडे जाण्याच्या मार्गावर ब्रीज जाईल, असा चौथा सर्व्हे करून न्याय देण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे. या बैठकीला स्थानिक नगरसेविका पूजा करसुळे, किशोर आंग्रे, माजी नगसेवक अक्षय ठाकूर, त्याचप्रमाणे भोलानगर रहिवासी गृहनिर्माण एकता संघ (नियो)चे प्रमुख ज्ञानेश्वर जाधव व ज्ञानेश्वर राजपंके, अंत्राम वाघमारे, कुणाल सूर्यवंशी, परेश रुकाडे, संभाजी मोरे, बळीराम बोंडेकर, सुरेश झेंडे नागरिक उपस्थित होते.
रेंटल सोसायटीमध्ये जाण्यास विरोध
भोलानगर येथील नागरिकांची घरे १९७० पासूनची आहेत. या ठिकाणी राहणाऱ्या नागरिकांचा उद्योग व्यवसाय याच परिसरात आहे. एकीकडे कळवा आणि प्रस्तावित दिघा रेल्वेस्टेशनजवळ असताना आम्ही इतरत्र राहायला का जायचे? असा प्रश्न उपस्थित करत पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी रेंटल हाउसिंग सोसायटीत स्थलांतरित करण्याचा निर्णय घेतला होता; पण त्याला स्थानिकांनी विरोध करून नजीकच्या ठिकाणीच पुनवर्सनाची मागणी लावून धरली आहे.