स्टार १०५९
अनिकेत घमंडी
लोकमत न्यूज नेटवर्क
डोंबिवली : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घातलेले निर्बंध शिथिल करताना राज्य सरकारने हॉटेल व रेस्टॉरंट रात्रीपर्यंत उघडे ठेवण्याची मुभा दिली आहे. मात्र, प्रत्येक कर्मचाऱ्याचे कोरोना प्रतिबंधक लसीकरण करण्याची अट घातली आहे. त्यानुसार शहरातील २०० हून अधिक हॉटेल, स्नॅक्स बार व्यावसायिकांनी त्यांच्या सुमारे पाच हजारांहून अधिक कामगारांचे लसीकरण करवून घेतले आहे. आतापर्यंत पहिला डोस घेतला असून, दुसरा घेण्यासाठी त्यांनी नियोजन केले आहे.
कोरोनाकाळात केलेल्या लॉकडाऊन व निर्बंधांचा मोठा फटका हॉटेल व्यावसायिकांना बसला आहे. आता कोरोना रुग्णांची संख्या घटल्याने निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. मात्र, हॉटेल व्यावसायिकांना नियमांच्या आधीन राहून रात्रीपर्यंत व्यवसाय करण्यास मुभा दिली आहे. त्यात लसीकरण ही मुख्य अट आहे. त्यानुसार हॉटेल, स्नॅक्स बार व्यावसायिक यांनी आपल्याकडील वेटर, शेफ, व्यवस्थापक, द्वारपाल, सुरक्षा रक्षक, साफसफाई करणारे आदी सर्वच कर्मचाऱ्यांचे लसीकरण करून घेतले आहे. सध्या अनेकांचा पहिला डोस घेऊन झाला आहे. लसीकरण करावे, यासाठी डोंबिवली हॉटेल ॲण्ड बार असोसिएशन स्वत: जागृती करत आहे.
नियमांचे पालन न केल्यामुळे संबंधित हॉटेलवर कोणत्याही सरकारी यंत्रणेने कारवाई केल्यास असोसिएशनला सहकार्य करणे अवघड होईल. त्यामुळे सर्व व्यावसायिक एकवटले आहेत. लसीकरणाबरोबरच सोशल डिस्टन्सिंग, मास्कचा वापर, वारंवार स्वच्छता, ग्राहकांना प्रवेशापूर्वी सॅनिटायझर उपलब्ध करून देणे, आजारी कर्मचाऱ्यांवर औषधोपच्चार करणे आदींवर भर दिला जात असल्याचे सूत्रांनी सांगितले.
----------
शहरातील लहान, मोठी हॉटेल्स - २०० हून अधिक
सध्या सुरू झालेले हॉटेल्स - २०० हून अधिक
हॉटेल कर्मचाऱ्यांची संख्या : ५ हजारांहून अधिक
-------------
काही जण दुसऱ्या डोसच्या प्रतीक्षेत
शहरातील फडके रोड, केळकर, टाटा लेन येथील हॉटेलमध्ये शेकडो कामगार कार्यरत आहेत. त्यातील बहुतांश जणांनी कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस घेतला आहे. बहुतांश कामगारांनी कोविशिल्डची पहिली मात्रा घेतली असून, ८४ दिवस पूर्ण झाल्यानंतर ते दुसरी मात्रा घेणार असल्याचे सांगण्यात आले. तर, काही जण दुसऱ्या डोसच्या प्रतीक्षेत आहेत.
--------------
टपऱ्यांवर अस्वच्छता
शहरात हॉटेलबरोबर चहा, सरबत, खाद्यपदार्थ तसेच पानटपऱ्याही आहेत. तेथे स्वच्छता नावालाच आहे. तेथे येणारे ग्राहक बिनदिक्कतपणे कुठेही हात, तोंड धुतात, थुंकतात. मात्र, त्याकडे कल्याण-डोंबिवली मनपाचे लक्ष नसल्याची नागरिकांची तक्रार आहे.
----------------
आमच्या संस्थेचे १०० पेक्षा जास्त सदस्य आहेत. त्यापैकी सर्व हॉटेल व्यावसायिकांनी त्यांच्या कामगारांचे लसीकरण करवून घेतले आहे. पहिला डोस सगळ्यांचा झाला आहे. तर, काहींनी आताच हॉटेल सुरू केल्याने माहिती घेण्याचे काम सुरू आहे. जे आमचे सदस्य नाहीत त्यांनाही आम्ही आवर्जून कामगारांचे लसीकरण करावे, कोरोनाचे नियम पाळावेत याबाबत सांगत आहोत. कामगार व ग्राहकांचे आरोग्य, सुरक्षेला प्राधान्य देण्याबाबत आम्ही सगळ्यांना सूचित केले आहे.
- अजित कित्ता शेट्टी, अध्यक्ष, डोंबिवली हॉटेल ॲण्ड बार असोसिएशन.
-----------------------
शासकीय यंत्रणेचा अंकुश नाही
एकंदरीत शहरात आढावा घेतला असता शासकीय यंत्रणा मात्र अशा कामगारांचे लसीकरण झाले आहे की नाही, याबाबत अंकुश ठेवताना दिसत नाही. तसेच त्या कामगारांचे लसीकरण व्हावे, यासाठी विशेष प्रयत्न, शिबिर राबविताना दिसत नाही. जनजागृतीही फारशी सुरू नसल्याचे आढळत आहे. त्याउलट व्यावसायिक जास्त सतर्क असल्याचे दिसून येत आहे.
-------------