कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीतील दोन लाख नागरिकांनी कोविड लसीचा पहिला डोस घेतल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली. महापालिकेने जानेवारी महिन्यापासून लसीकरणाची मोहीम सुरू केली.
महापालिकेस पहिल्या वेळेस सहा हजार डोस प्राप्त झाले. विविध वयोगटानुसार लसीकरण सुरू केले जाईल, असे सांगण्यात येत होते. त्यानंतर कोरोनाची दुसरी लाट सुरू झाली. तेव्हा लसीकरणासाठी प्रत्येक वयोगटातील लोक आग्रह धरू लागले. महापालिकेने लसीकरण केंद्रावर लसीकरण सुरू केले. खासगी रुग्णालयात लसीकरणाची परवानगी दिली. लसीचा साठा अपुरा येत असल्याने पुरेशा डोसअभावी खासगी रुग्णालयातील लसीकरण बंद केले. ४५ वर्षांपुढील नागरिकांचे लसीकरण सुरू असताना १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण मे महिन्यापासून सुरू आहे. मात्र या वयोगटातील लसीकरणात अनेकवेळा बाधा आली. त्यामुळे या वयोगटातील तरुणांना लसीचा पहिला डोस देणे स्थगित करण्यात आले. दरम्यान, सर्व केंद्रांवरील लसीकरण दोन दिवस बंद ठेवून, परदेशी जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे लसीकरण केले. महापालिका दोन लाख लसी खरेदी करणार होती. या निविदेस प्रतिसाद न मिळाल्याने ही खरेदी प्रक्रिया प्रलंबित आहे. खासगी रुग्णालयांना लसीकरणाची मान्यता दिली आहे. या सगळ्या गदारोळात आतापर्यंत केवळ दोन लाख नागरिकांनी लसीचा पहिला डोस घेतला आहे. महापालिका हद्दीत १८ लाख लोक वास्तव्य करतात. लसीकरणाची ही मंदगती कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर नागरिकांच्या मनात भीती निर्माण करणारी आहे.
.............