ठाणे : दुसऱ्यांच्या भरवशावर खुर्ची मिळवणाऱ्या माणसाने शब्द द्यायचा नसतो. आधी स्वत:च्या बळावर सत्ता मिळवा आणि मग लोकांना शब्द द्या, असा टोला मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना मारला. दिवा येथील जाहीर सभेत ते बोलत होते.भाजपा-सेनेसह काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचाही त्यांनी या वेळी समाचार घेतला. भाजपा-सेनेच्या राज्यात मराठी माणसांचे मुंबईत बेहाल झाले. मुंबईत अनधिकृत इमारतींचे जाळे आहे. परंतु, जिथे मराठी माणसे राहतात, तिथेच कारवाई करण्याची हिंमत दाखवली जाते. परप्रांतीयांच्या मतांवर त्यांचा डोळा आहे. म्हणूनच जुहू येथील प्रचारसभेत मुख्यमंत्र्यांनी हिंदीत भाषण केल्याचा आरोप ठाकरे यांनी केला. अनधिकृत इमारती उभारणाऱ्या बांधकाम व्यावसायिकांवर नावाला गुन्हे दाखल केले जातात. ते जामिनावर लगेच सुटतात. पण मराठी माणूस बेघर होतो. या मराठीजनांना घराबाहेर काढणारे नतद्रष्ट दुर्दैवाने आपलेच आहेत. काँग्रेस-राकाँने जे केले, तोच कित्ता भाजपा-सेना गिरवत असल्याचा आरोपही त्यांनी केला. शासकीय आकडेवारीनुसार ठाणे जिल्ह्यात परप्रांतीयांची लोकसंख्या दररोज वाढतेय. परप्रांतीयांना वाढू देणाऱ्या लाचारांच्या हातातच येथील महापालिकांची सत्ता आहे. ठाण्यात सर्व प्रमुख पक्षांचे नेते बांधकाम व्यवसायात आहेत. येथील अनधिकृत इमारती त्यांच्याच नावे असल्याचा स्पष्ट आरोप ठाकरेंनी केला. दिव्यातील डम्पिंग ग्राउंडच्या प्रश्नावर मनसेने आंदोलन केल्यानंतर आयुक्तांनी तीन महिन्यांत प्रश्न सोडवण्याचे आश्वासन दिले. मुख्यमंत्री मात्र हाच प्रश्न सोडवण्यासाठी एक वर्षाची मुदत मागतात. डम्पिंग ग्राउंडचा प्रश्न योग्य पद्धतीने नाशिक महापालिकेने सोडवला असल्याचा दावा त्यांनी या वेळी केला. दिवा आणि ठाण्यातील स्थानिक प्रश्नांनाही त्यांनी हात घातला. गेली २५ वर्षे ठाण्याची सत्ता भाजपा-सेनेच्या हाती होती. त्यांच्याच राजवटीत येथील समस्या आणि अनधिकृत बांधकामे वाढल्याचा आरोप ठाकरे यांनी केला.भाजपाकडून अपमानास्पद वागणूक मिळते, म्हणून उद्धव ठाकरे पाठिंबा काढण्याची धमकी देतात. वास्तविक, त्यांचा अपमान दररोज होत आहे. शिवस्मारकाच्या जलपूजनासाठी आलेल्या पंतप्रधानांनी उद्धव ठाकरेंकडे ढुंकूनही पाहिले नव्हते. आता आणखी अपमान सहन होण्याची ते वाट बघत आहेत का, असा सवाल त्यांनी केला. नोटाबंदीबाबत बोलताना ठाकरे यांनी हा प्रयोग फसल्याचा आरोप केला. म्हणूनच, आता पंतप्रधान या विषयावर बोलण्याचे टाळत असल्याचा आरोप ठाकरे यांनी केला. (प्रतिनिधी)
आधी स्वबळावर खुर्ची मिळवा; मगच लोकांना शब्द द्या!
By admin | Published: February 16, 2017 5:07 AM