ठाणे - छत्रपती शिवाजी महाराज आत्मसन्मान योजनेंतर्गत कर्जमाफीचा पहिला हप्ता बुधवार 18 ऑक्टोबरला सकाळी एका समारंभात ठाणे जिल्ह्यातील पात्र लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे. 18 ऑक्टोबरला सकाळी 11 वाजता जिल्हा नियोजन भवनाच्या पहिल्या मजल्यावरील सभागृहात होणाऱ्या या कार्यक्रमास पालकमंत्री एकनाथ शिंदे, जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांची उपस्थिती असेल, असे जिल्हा उपनिबंधक मीना आहेर यांनी सांगितले.
कर्जमुक्ती प्रारंभचा राज्यस्तरीय कार्यक्रम सह्याद्री अतिथीगृह येथे बुधवारी (18 ऑक्टोबर) सकाळी 11 वाजता होणार असून यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच इतर मंत्रीमहोदयांची उपस्थिती असणार आहे. सर्व जिल्ह्यांमध्ये संबंधित पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत हे कार्यक्रम होतील. सोमवारी (16ऑक्टोबर )सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी यासंदर्भात व्हिडीओ कॉन्फरन्स घेऊन याबाबतच्या नियोजनाचा आढावाही जिल्हाधिकाऱ्यांकडून घेतला.
शेतक-यांना दिवाळी भेट! कर्जमाफीची रक्कम उद्या खात्यात , मुख्यमंत्र्यांची घोषणा
शेतक-यांची दिवाळी गोड व्हावी, म्हणून पहिल्या टप्प्यात दहा लाख शेतक-यांच्या बँक खात्यात कर्जमाफीची रक्कम १८ आॅक्टोबर रोजी जमा होणार आहे. त्यानंतर, टप्प्याटप्प्याने महिनाभरात सर्वच पात्र शेतक-यांच्या बँक खात्यात रक्कम जमा करण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी जालना येथे सांगितले. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान कर्जमाफी योजनेंतर्गत पात्र शेतक-यांना कर्जमाफीचा फायदा देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्यानुसार, थकबाकीदार व नियमित कर्ज भरणा-या शेतक-यांनी कर्जमाफी योजनेचा फायदा घेण्यासाठी आॅनलाइन भरलेल्या अर्जाचे लेखापरीक्षण करून, ते बँकांनी शासनाच्या पोर्टलवर अपलोड केले आहे. पोर्टलवर अपलोड केलेल्या माहितीच्या आधारे शासनाच्या आय. टी. विभागाने तपासणी करून त्याची वर्गवारी केली आहे. ग्रीन, यलो, रेड व व्हाइट अशा वर्गवारी केलेल्या शेतक-यांच्या याद्यांपैकी ‘ग्रीन’ यादी कर्जमाफीस पात्र राहाणार आहे. या याद्या जिल्हास्तरावर बँका व तालुकास्तरीय समितीला मंगळवारी मिळणार असून, याच आधारे सन्मानासाठी शेतकºयांची नावे निश्चित केली जाणार आहेत.शेतक-यांचा सत्कारबुधवारी मुंबईत राज्यभरातील निवडक शेतक-यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार आहे. कर्ज माफ झाल्याचे मुख्यमंत्र्यांच्या सहीचे प्रमाणपत्र, साडी-चोळी देऊन सपत्नीक सत्कार केला जाणार आहे. ग्रीन, यलो, रेड व व्हाइट अशी वर्गवारी केलेल्या शेतक-यांच्या याद्यांपैकी ‘ग्रीन’ यादी कर्जमाफीस पात्र.