ठाणे : पहिले आंतरराष्ट्रीय तटस्थ क्रिकेट पंच आणि विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात अम्पायर राहिलेले भारताचे एकमेव पंच पिलू दादा रिपोर्टर यांचे रविवारी सकाळी वृद्धपकाळाने निधन झाले. ते ८५ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी होमाय आणि दोन कन्या असा परिवार आहे. १९८६ -८७ साली पाकिस्तानमध्ये झालेल्या वेस्ट इंडिज विरुद्ध पाकिस्तान मालिकेत पिल्लू रिपोर्टर बीके रामस्वामी या पंचांनी क्रिकेट इतिहास प्रथमच नेमले गेलेले तटस्थ पंच म्हणून काम पाहिले.
रिपोर्टर हे जन्मापासून ठाण्यात वास्तव्यास होते. मराठी, हिंदी, इंग्रजी, गुजराती या चार भाषा त्यांना अवगत होत्या. ठाणे येथील टेंभीनाक्याजवळ रिपोर्टर हे वास्तव्यास होते. १९८४ साली डेव्हिड गोव्हर हे इंग्लंड संघ भारताच्या दौऱ्यावर आले असता त्या दौऱ्यात पिल्लू रिपोर्टर व एम वाय गुप्ते या ठाण्याच्या पंचांनी कसोटी पंच म्हणून पदार्पण केले. १९८४ ते १९९३ दरम्यान रिपोर्टर यांनी एकूण १४ कसोटी तर १९८४ ते १९९४ दरम्यान त्यांनी २२ एकदिवसीय सामन्यात तसेच, १३ प्रथम दर्जाच्या सामन्यात त्यांनी पंच म्हणून काम पाहिले. निवृत्तीनंतर मार्गदर्शन करताना ते या चारही भाषांचा माध्यम म्हणून उपयोग करत. ठाण्याच्या मुलांसाठी रिपोर्टर यांच्या मार्गदर्शनाखाली दादोजी कोंडदेव क्रीडा प्रेक्षागृहात प्रथमच अभ्यास वर्गाचे आयोजन केले. डॉ. प्रकाश वझे, शानबाग व विजय प्रधान ही या अभ्यास वर्गातील त्रिमूर्ती सुवर्णपदकाचे मानकर ठरले.