डोंबिवली : राज्य सरकारच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाने घेतलेल्या ५७ व्या राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीच्या कल्याण केंद्राच्या निकालाला लागलेल्या विलंबाप्रकरणी शुक्रवारी ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रसिद्ध होताच या स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला. त्यात अभिनय संस्थेच्या ‘दोजख’ नाटकाला प्रथम पारितोषिक, तसेच डोंबिवलीतील नवराम दर्शन को आॅप हौ. सोसायटी या संस्थेच्या ‘भिजलेल्या गोष्टी’ या नाटकाला द्वितीय पारितोषिक जाहीर झाले आहे. या दोन्ही नाटकांची निवड अंतिम फेरीसाठी झाली आहे.कल्याण केंद्राची प्राथमिक फेरी यंदा डोंबिवलीतील सावित्रीबाई फुले कलामंदिरात ६ ते २० डिसेंबरदरम्यान पार पडली. या स्पर्धेत २४ हौशी नाट्यसंस्थांनी सहभाग घेतला होता. मात्र, आठ दिवस झाल्यानंतरही स्पर्धेचा निकाल जाहीर झालेला नव्हता. त्यामुळे या मागील गौडबंगाल काय?, असा प्रश्न स्पर्धेतील सहभागी नाट्य संस्थांना पडला होता. स्पर्धा संपताच लागलीच दुसºया दिवशी निकाल जाहीर होतो. परंतु, निकाल विलंब लागणे हे आजवरच्या इतिहासात कधीच घडलेले नाही, अशी मते जाणकारांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केली होती.त्याबाबत बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर अखेर शुक्रवारी निकाल जाहीर करण्यात आला. त्यानुसार प्रथम क्रमांक ‘दोजख’ आणि द्वितीय क्रमांक ‘भिजलेल्या गोष्टी’, तृतीय क्रमांक बदलापूरच्या एम्पिरिकल फाउंडेशनच्या ‘बिर्याणी’ने पटकावला. दिग्दर्शनाचे पहिले पारितोषिक मयूर निमकर (नाटक -भिजलेल्या गोष्टी), द्वितीय पारितोषिक अभिजीत झुंजारराव (दोजख), प्रकाश योजना विभागासाठी प्रथम क्रमांक दोजख नाटकाचे श्याम चव्हाण, भिजलेल्या गोष्टी या नाटकाची प्रकाश योजना पाहणारे विशाल वाघमारे यांना द्वितीय पारितोषिक मिळाले आहे. नेपथ्यामध्ये प्रथम क्रमांक वल्लभ रावण (बिर्याणी), द्वितीय क्रमांक भरत शिंदे (भिजलेल्या गोष्टी) यांनी पटकाविला. रंगभूषेसाठी प्रथम क्रमांक उल्लेश खंदारे (बिर्याणी), द्वितीय क्रमांक श्वेता शिंदे (दोजख) यांना मिळाला. तर उत्कृष्ट अभिनयात धनंजय धुमाळ (कॅलिग्युला) आणि गायत्री पाटील (बिर्याणी) या दोघांनी रौप्यपदक पटकाविले. तसेच अक्षया सामंत (दोजख), गायत्री दीक्षित (देहभान), चैताली गानू (केस नं ९९), तेजल पोतदार व समीर जेड्ये (भिजलेल्या गोष्टी), कौशल जोबनपुत्रा (बिर्याणी), चंद्रास कांबळे (६७२ रुपयांचा सवाल) विजय वारूळे (स्मशानचक्र) आदींना अभिनय गुणवत्ता प्रमाणपत्र जाहीर करण्यात आली.या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून अरुण पटवर्धन, मुकुंद मराठे, विश्वास पांगारकर यांनी काम पाहिले. विजेत्यांचे सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी अभिनंदन केले आहे.>‘लोकमत’चे विशेष आभार‘लोकमत’ने वृत्त देताच नाट्य विभागाला जाग आली आणि त्यांनी निकाल जाहीर केले. निकालाबाबत सर्वच कलाकारांमध्ये आतुरता होती. परंतु, निकाल लागल्याने कलाकारांनी समाधान व्यक्त केले आहे, असे नाट्य परिषद कल्याण शाखेचे उपाध्यक्ष सुरेश पवार यांनी सांगितले.