ठाणे - थीम पार्क आणि बॉलीवुड पार्कच्या मुद्यावरुन मागील महिन्यात दिवसभर चर्चा झाल्यानंतर या संदर्भात चौकशी करण्यासाठी समिती गठीत करण्याचा ठराव करण्यात आला होता. या ठरावावर स्वाक्षऱ्या झाल्यानंतर अखेर या समितीची पहिली बैठक शुक्रवारी सांयकाळी महापौरांच्या दालनात आयोजित करण्यात आली आहे.
घोडबंदर भागातील नवीन ठाणे जुने ठाणे (थीम पार्क) च्या मुद्यावरुन मागील महिन्यात झालेल्या महासभेत सर्व पक्षीय लोकप्रतिनिधींनी प्रशासनावर आगपाखड केली होती. दिवसभर चर्चा झाल्यानंतर या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एक समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर जे सत्य बाहेर येईल त्यानुसार संबधीतावर कारवाई केली जाईल असाही निर्णय घेण्यात आला होता. तसेच या संदर्भातील ठरावही करण्यात आला होता. परंतु त्या ठरावावर एक आठवडा स्वाक्षऱ्याच झाल्या नव्हत्या. मधल्या काळात शिवसेना विरुध्द भाजपा असा आरोप प्रत्यारोपांचा सामनाही ठाणेकरांनी अनुभवला होता. अखेर येत्या शुक्रवारी सांयकाळी पाच वाजता महापौर मीनाक्षी शिंदे यांच्या दालनात या समितीची पहिली बैठक आयोजित करण्यात आली आहे. या समितीच्या अध्यक्षस्थानी महापौर स्वत: असणार आहेत. तसेच या समितीमध्ये उपमहापौर रमाकांत मढवी, सभागृह नेते नरेश म्हस्के, विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील, सर्व पक्षीय गटनेते आणि ज्यांनी या विषयाला वाचा फोडली ते नजीब मुल्ला सुध्दा या समितीमध्ये असणार आहेत. शिवाय अतिरिक्त आयुक्त (१) हे सुध्दा या समितीत असणार असून सेवानिवृत्त अधिकारी गिरीष मेहंदळे यांनी या समितीत येण्यास नकार दिल्याने आता त्यांच्या जागी दोन सेवानिवृत्त अधिकारी घेण्याचा विचार समितीने केला आहे. आता हे सेवानिवृत्त अधिकारी कोण असतील हे पहिल्या बैठकीतच स्पष्ट होणार आहे. त्यात या बैठकीत काय निर्णय होतो, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.