अमर शैला मुंबई - वडाळा ते कासारवडवली (मेट्रो ४) आणि कासारवडवली ते गायमुख (मेट्रो ४ अ) या दोन मेट्रो मार्गिकांच्या मिळून दहा स्थानकांवरून या वर्षअखेर मेट्रो धावणार आहे. कॅडबरी जंक्शन ते गायमुख मार्गावर ही मेट्रो धावणार असल्याने ठाणे शहराला डिसेंबरअखेर पहिली मेट्रो मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मंडाळे ते चेंबूर (मेट्रो २ बी) आणि दहीसर ते काशीगाव (मेट्रो ९) हा मार्गही डिसेंबरपर्यंत सुरू होणार आहे. त्यामुळे वर्षअखेरीस नव्या चार मेट्रोंचा पहिला टप्पा प्रवाशांच्या सेवेत येईल.
मेट्रो ४ ही ३२.३२ किमी, तर मेट्रो ४ अ ही २.७ किमीची मार्गिका आहे. या दोन्ही मार्गिकांवर मिळून ३२ स्थानके आहेत. यातील पहिल्या टप्प्यात १०.५ किमीच्या मार्गावर मेट्रो सेवा सुरू केली जाईल. मेट्रो ४चे कारशेड उभारण्यासाठी आणखी काही वेळ लागणार आहे. मात्र, एमएमआरडीएचे महानगर आयुक्त संजय मुखर्जी यांनी पदभार घेतल्यानंतर कारशेडविना मेट्रो सुरू केली जाऊ शकते का, याची चाचपणी करण्याची सूचना अधिकाऱ्यांना केली होती. त्यामध्ये अतिरिक्त तपासणी मार्गिका उभारून मेट्रो सेवा सुरू होऊ शकते, हे स्पष्ट झाले. त्यानुसार, एमएमआरडीएने मेट्रो सुरू करण्याच्या दिशेने पावले उचलली आहेत, असे सुत्रांनी सांगितले.
दरम्यान, मेट्रो ९च्या दहीसर ते काशीगाव या पहिल्या टप्प्यात ४.५ किमीवर चार स्थानके आहेत. हा मार्ग जुलैपर्यंत सुरू होण्याची शक्यता आहे. मेट्रो २ बी मार्गावर मंडाळे ते डायमंड गार्डन या पहिल्या टप्प्यात ५.३ किमी मार्गावर पाच मेट्रो स्थानके प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहेत.