कुमार बडदेमुंब्रा : ठाणे महापालिकेच्या बहुउद्देशीय योजनांपैकी एक असलेल्या प्लॅटफॉर्म शाळेची अंमलबजावणी अंतिम टप्प्यात आली असून ती पुढील तीन दिवसांमध्ये मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळ सुरू होणार आहे. ठामपा हद्दीत राहणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला शिक्षण घेता यावे. एकही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये, यासाठी राबवण्यात येत असलेल्या शैक्षणिक धोरणांतर्गत काही महिन्यांपूर्वी रस्त्यावर व्यवसाय करणाºया तसेच फिरत असलेल्या मुलांसाठी सिग्नल शाळा सुरू करण्यात आली.
त्यानंतर, रेल्वेस्थानकांवर फिरत असलेल्या तसेच व्यवसाय करत असलेल्या मुलांसाठी सुरू करण्यात येणारी पहिली प्लॅटफॉर्म शाळा सुरू करण्यासाठी संस्थेची निवड तसेच इतर प्रक्रि या पूर्ण करण्यात आली आहे. तीन दिवसांमध्ये ही शाळा सुरू करण्यात येणार असल्याची माहिती शिक्षण अधिकारी मनीष जोशी यांनी लोकमतला दिली. दरम्यान, शाळा सुरू करण्यापूर्वी शाळेच्या आजूबाजूची साफसफाई करून परिसर स्वच्छ करण्यात यावा, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.