नितीन पंडित, लोकमत न्यूज नेटवर्क, भिवंडी : शहर व ग्रामीण भागात रविवारी रात्रीपासून होत असलेल्या मुसळधार पावसामुळे भिवंडी शहरातील तीनबत्ती,भाजी मार्केट,बाजारपेठ परिसरात रस्त्यावर २ ते ३ फुटांपर्यंत पाणी साचले.येथील अनेक दुकानात पाणी शिरल्याने दुकाना मधील साहित्याचे मोठे नुकसान झाले आहे.
भिवंडी महापालिका प्रशासनाच्या वतीने २ कोटी ९ लाख रुपये खर्च करून नालेसफाई करण्यात आली आहे.ज्या भागात पाणी साचेल तेथील ठेकेदारांवर दंडात्मक कारवाई करून अशा ठेकेदारांचे बिल अदा करणार नाही असा इशारा आयुक्त विजयकुमार म्हसाळ यांनी अगोदरच दिला होता.त्यामुळे आता नक्की आयुक्त कोणावर कारवाई करतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. शहरातील पालिका प्रशासनाने केलेल्या नालेसफाईची पोलखोल या पहिल्या पावसाने केली आहे .