ठाणे : वेळेपूर्वी मान्सून दाखल झाल्याने एकीकडे उकाडय़ाने हैराण झालेले सर्वसामान्य सुखावले असताना ठाण्यातील मनोरमा नगरवासीयांना मात्र पहिल्याच पावसात चिखलाने बरबटलेल्या रस्त्यांचा सामना करावा लागत आहे. या ठिकाणी सुरू असलेल्या बांधकाम साईटवरील डंपरच्या चाकांमुळे चिखल येथील सर्व रस्त्यांवर पसरत असून अशा निसरड्या रस्त्यावरून घसरून पडल्याने बाईकवर जखमी होत आहेत. याबाबत पालिका प्रशासनाने तात्काळ कारवाई करत या रस्त्यांवर चिखल पसरणार नाही, याची खबरदारी घ्यावी, तसेच संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी मनसेने केली आहे.
ठाण्याच्या मनोरमा नगर भागात कन्स्ट्रक्शनचे काम चालू आहे. नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून कोणतीही संरक्षण यंत्रणा न उभारता कन्स्ट्रक्शन कामाचे डंपर मनोरमानगरच्या रस्त्यावरून ये-जा करत आहेत. त्यामुळे रस्त्यावरती सतत चिखल होत आहे. नुकत्याच सुरू झालेल्या पावसामुळे येथील सर्व रस्ते चिखलमय झाले होते. आजूबाजूच्या परिसरात हजारोंची लोकवस्ती असल्याने हा रस्ता प्रचंड वर्दळीचा असतो. त्यातच आता अनलॉकनंतर या रस्त्यावरील वाहतूकही वाढली आहे. त्यामुळे या निसरड्या रस्त्यांवरुन पादचाऱ्यांना चालणे व दुचाकीस्वारांना गाडी चालवणे कठीण झाले आहे. त्यामुळे ठाणे महानगरपालिकेने याठिकाणी पाहणी करून संबंधितांवर त्वरीत कारवाई करावी अशी मागणी मनसे विद्यार्थी सेना ठाणे उपशहर अध्यक्ष प्रमोद पत्ताडे यांनी केली आहे.
अपघात घडल्यास जबाबदार कोण?
सध्या पावसाळ्याचे दिवस असून पाऊस आणि चिखल यामुळे या रस्त्यावरून चालणे कठीण होते. तसेच या भागातील बाईकस्वार घसरून पडत असल्याच्या घटना मोठ्या प्रमाणात घडत आहेत. त्यामुळे भविष्यात मोठा अपघात घडल्यास जबाबदार कोण असा सवाल, प्रमोद पत्ताडे यांनी उपस्थित केला आहे.