ठाणे : ठाणे शहरातील पहिला विज्ञान कट्टा येत्या शनिवार सायंकाळी ६ वाजता ब्रह्मांड फेज२ येथे सुरू होणार असून त्याचे उद्घाटन ठाणे शहराचे महापौर नरेश म्हस्के यांच्या हस्ते होणार आहे.
मराठी विज्ञान परिषद ठाणे विभागातर्फे ठाणे शहरात असे विज्ञान कट्ट्याचे कार्यक्रम ठिकठिकाणी आयोजित करण्यात येणार असल्याचे संस्थेचे अध्यक्ष दा. कृ. सोमण यांनी सांगितले. याविषयी अधिक माहिती देताना दा. कृ. सोमण म्हणाले की " टेलिव्हिजनवर कार्यक्रम पाहतांना किंवा वृत्तपत्रातील विज्ञान विषयक लेख वाचतांना वाचकांना प्रश्न विचारता येत नाहीत. त्यांच्या मनातील प्रश्न तसेच अनुत्तरीत राहतात."
विज्ञान कट्ट्यावर विविध वैज्ञानिक विषयांवरील माहिती अनौपचारिक पद्धतीने दिली जाईल आणि जनसामान्यांच्या मनातील प्रश्नाना उत्तरे दिली जातील. विज्ञानाचा प्रचार व प्रसार मराठीतून करण्याचे मराठी विज्ञान परिषदेचे उद्दिष्ट आहे. प्रत्येक विषयातील तज्ज्ञ आणून लोकांच्या प्रश्नांची उत्तरे दिली जातील. विज्ञान कट्ट्याचा हा प्रयोग कदाचित महाराष्ट्रातील पहिलाही असू शकेल असेही दा. कृ.सोमण यांनी सांगितले.
शनिवार, दि. १४ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता ब्रह्मांड फेज -२ पोलीस चौकी समोर, ब्रह्मांड, ठाणे पश्चिम येथे होणारा विज्ञान कट्टा कार्यक्रम शुभकुंदा प्रतिष्ठानच्या सहकार्याने आयोजित करण्यात आला आहे. यावेळचा विषय 'येत्या २६ डिसेंबरला भारतातून दिसणारे सूर्यग्रहण' हा असून यावेळी सूर्यग्रहणाविषयी संपूर्ण माहिती दिली जाईल आणि ग्रहणविषयक समज-गैरसमज याविषयी वैज्ञानिक माहितीही दिली जाईल. हा कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य राहील तरी जास्तीत जास्त ठाणेकरांनी याचा लाभ घ्यावा असेही दा. कृ. सोमण यांनी सांगितले.