लोकमत न्यूज नेटवर्कडोंबिवली : फेरीवाल्यांनी आधी शिवसैनिकांना सामोरे जावे. त्यानंतर लष्कराशी सामना करावा, असा इशारा शिवसेना शहरप्रमुख भाऊ चौधरी यांनी फेरीवाल्यांना दिला आहे. मात्र, कोणीही आले, स्टंटबाजी केली तरी आम्ही हटणार नाही. आधी आमचे पुनर्वसन करा, अन्यथा आम्ही इथेच बसणार, असा आक्रमक पवित्रा फेरीवाल्यांनी घेतला आहे. त्यामुळे डोंबिवलीत शिवसेनाविरुद्ध फेरीवाले, असा सामना रंगला आहे.डोंबिवलीत फेरीवाल्यांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत आहे. पूर्वेला रेल्वे स्थानकाला लागूनच राथ रोड, पाटकर रस्त्यावर आणि टॉकीज परिसरात रस्ते, पदपथ व्यापणाऱ्या फेरीवाल्यांविरोधात युवा सेनेने अगोदर आंदोलन छेडले होते. त्यावेळी फेरीवाला संघटनेने लष्कर आले तरी हटणार नाही, अशी आक्रमक भूमिका घेतली होती. युवा सेनेपाठोपाठ चौधरी यांनी फेरीवाल्यांच्या प्रश्नी हात घातला. महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजय घरत यांना त्यांनी निवेदन देत फेरीवाल्यांवर कारवाईची मागणी केली होती. त्यानुसार शनिवारी रात्री अचानकपणे शिवसेना, महापालिकेचे ‘ग’ प्रभागक्षेत्र अधिकारी परशुराम कुमावत यांनी अतिक्रमणविरोधी पथक आणि पोलिसांनी फेरीवाल्यांविरोधात कारवाई केली. मात्र, त्यांची पाठ फिरताच फेरिवाल्यांनी तेथे बस्तान मांडले. फेरीवाल्यांविरोधात पालिकेने सातत्याने कारवाई केली पाहिजे. बहुतांशी वेळेला महापालिका कर्मचारी व अधिकारी कानाडोळा करतात. त्यामुळे कारवाई होत नाही. यापुढे तसे चालणार नाही. फेरीवाल्यांच्या मनमानी कारभाराला आळा घालावा लागणार आहे. रेल्वेस्थानक परिसर फेरीवालामुक्त करूनच दाखवणार, असा निर्धार चौधरी यांनी केला आहे. त्यामुळे सेना विरूद्ध फेरीवाले संघर्ष चिघळला आहे.
आधी शिवसैनिकांना सामोरे जाऊन दाखवा
By admin | Published: May 22, 2017 1:59 AM