ठाणे - अयोध्येसाठी शिवसैनिक ठाण्याहून उत्तर प्रदेशकडे रवाना झाला आहे. एलटीटी येथून अयोध्या विशेष गाडी गुरुवारी दुपारी सोडण्यात आली. या गाडीतून हजारो शिवसैनिक ठाण्यातून रवाना झाले आहेत. यावेळी ठाणे रेल्वे स्थानकात जय श्रीरामच्या आणि पहिले मंदिर फिर सरकार... अशा घोषणा देण्यात आल्या. तर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेही 24 तारखेला अयोध्येला जाणार आहेत.
ठाण्याच्या महापौर मिनाक्षी शिंदें यांनी शिवसैनिकांनी भरलेल्या या गाडीला झेंडा दाखवला. याप्रसंगी ठाणे जिल्हा प्रमुख (ग्रामीण) प्रकाश पाटील, गोपाळ लांडगे, ठामपा सभागृह नेते नरेश म्हस्के आणि मोठ्या प्रमणात शिवसैनिक हजर होते. दरम्यान, याप्रसंगी लोहमार्ग, आरपीएफ आणि शहर पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला होता. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. राम मंदिराचा मुद्दा नको तर मंदिर हवे, असा चंग उद्धव ठाकरेंनी बांधला आहे. त्यासाठी 24 तारखेला उद्धव ठाकरे अयोध्येला जाणार आहेत. तत्पूर्वी आज उद्धव ठाकरेंनी शिवनेरीवर जाऊन शिवरायांच्या जन्मभूमीती मातीचे दर्शन घेतले. यावेळी, छत्रपती शिवाजी महाराज हे तमाम हिंदूंचे दैवत आहेत. म्हणूनच शिवरायांच्या जन्मभूमीतील माती म्हणजे हिंदूंच्या भावना घेऊन मी अयोध्येला निघालो आहे, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. उद्धव ठाकरे यांचा अयोध्या दौरा हा राज्य आणि देशाच्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे. तर त्यांच्या अयोध्या दौऱ्यावरून घमासान सुरू आहे. राम मंदिराबाबत संवाद साधण्यासाठी उद्धव यांनी पाठवलेले निमंत्रण संत-महंतांनी धुडकावून लावले आहे. या नेत्यांना रामापेक्षा राजकारणात रस असल्याचा आरोपही आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्र गिरी महाराज यांनी केला.