ठाणे: पोलीस शहीद दिनानिमित्त ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाजवळील शहीद स्तंभाला पोलिसांच्या वतीने शुक्रवारी मानवंदना देण्यात आली. यावेळी प्रथमच ठाणे शहर आणि ग्रामीण पोलिसांच्या महिला प्लाटूनला मानवंदनेचा मान दिला गेला.कर्तव्यावर असतांना शहीद झालेले पोलीस, राज्य राखीव पोलीस दलातील जवान, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल तसेच सीमा सुरक्षा दलातील जवानांच्या स्मृतीप्रित्यर्थ २१ आॅक्टोबर रोजी पोलिसांतर्फे मानवंदना दिली जाते. शुक्रवारी ठाणे ग्रामीण कार्यालयाजवळील पोलीस स्मृती स्तंभालाही सकाळी ८ वाजता मानवंदना देण्यात आली. यावेळी वर्षभरात देशभरातून शहीद झालेल्या ४७३ पोलिसांच्या नावांचे वाचन करण्यात आले. यामध्ये एका चालकाच्या मारहाणीत शहीद झालेले मुंबई शहर पोलीस दलातील विलास शिंदे यांच्यासह महाराष्ट्र पोलीस दलातील पाच पोलिसांचा समावेश होता. यंदा प्रथमच ठाण्यात शहर पोलिसांच्या दोन तर ग्रामीणच्या एका महिला प्लाटूनने पोलीस उपनिरीक्षक प्रियंका शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मानवंदना दिली. सहायक पोलीस आयुक्त रमेश धुमाळ यांनी परेडचे कमांडींग केले तर सेकंड कमांडीग राखीव पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे हे होते.
ठाण्यात प्रथमच महिलांच्या प्लाटूनची पोलीस शहिदांना मानवंदना
By admin | Published: October 21, 2016 10:34 PM