ठाणे : महाराष्ट्रातील पहिला महिला शेतकरी आठवडा बाजार ठाण्यात सुरु होत आहे. संस्कार संस्था व कृषी पणन मंडळ, महाराष्ट्र राज्य यांच्या विद्यमाने शुक्रवार १ मार्च रोजी ठाण्यातील हितवर्धिनी सभा मैदान, उमा नीलकंठ व्यायाम शाळा, नौपाडा ठाणे या ठिकाणी हा बाजार साय. ४. ३० वा. सुरु होणार असून सदाभाऊ खोत, राज्यमंत्री कृषी पणन मंडळ, महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते या महिला शेतकरी आठवडी बाजाराचे उदघाटन होणार असल्याची माहिती आमदार संजय केळकर यांनी दिली.
सोलापूर मधील हा महिला शेतकरी गट असून वांगी, गाजर, मटार, भेंडी, मेथी, कोथांबीर, कोबी, फ्लॉवर, दुधी, शिमला मिर्ची, घेवडा, शेवगाच्या शेंगा, अद्रक, लिंबे, कांदा, बटाटे, डाळिंब, द्राक्षे, चिकू असे विविध फळे व भाज्या विक्रीस असतील अशी माहिती आमदार केळकर यांनी बोलताना दिली. या आठवडी बाजाराला ठाणेकरांनी अवश्य भेट द्यावी व महिला शेतकऱ्यांना बळ द्यावे असे आवाहन आयोजक आ. केळकर यांनी केले आहे.
महाराष्ट्रातील प्रथम संत शिरोमणी सावता माळी शेतकरी आठवडा बाजारास ठाण्याचे आमदार संजय केळकर यांच्या संस्कार संस्थेच्या माध्यमातून व कृषी पणन मंडळाच्या सहकार्याने ठाण्यात गावदेवी मैदानात २०१६ रोजी सुरुवात झाली. यामुळे शेतकरी व ग्राहक यांची थेट भेट होऊन यातील दलाल निघून थेट शेतकऱयांना व ग्राहकांना फायदा होत आहे. ठाण्यात आ. केळकर यांच्या संस्कार संस्थेच्या माध्यमातून गावदेवी मैदान, कोलाबाड, एस आर ए कार्यालय, आकाशगंगा, राबोडी, उन्नती गार्डन शिवाईनगर, वेदांत कॉम्प्लेक्स वर्तक नगर आदी ठिकाणी यशस्वी रित्या शेतकरी आठवडी बाजार सुरु आहेत.