बदलापूर नगरपालिकेमार्फत शहरातील अनेक तलावांची स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली होती. गावदेवी परिसरात असलेल्या तलावाचे काम पूर्ण होऊन मोठा गाजावाजा करीत येथे उद्घाटनदेखील करण्यात आले होते. मात्र, काही महिन्यांतच या तलावाचे पाणी प्रदूषित झाल्याने कासव आणि माशांचा मृत्यू झाला. मज्जाव केल्यानंतरही अनेक नागरिक या तलावात निर्माल्य आणून टाकत असतात. रात्रीच्या वेळी या परिसरात मद्यपींचा वावर असल्याने दारूच्या, तसेच पाण्याच्या प्लास्टिकच्या बाटल्यादेखील मोठ्या प्रमाणात तलावात साचल्या आहेत. कासव आणि माशांचा मृत्यू झाल्यामुळे या परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली आहे. अनेक मच्छिमार या तलावात मासेमारी करतात. मात्र, माशांच्या मृत्यूमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. कासव आणि माशांच्या मृत्यूबाबत पालिकेच्या अधिकाऱ्यांना विचारले असता आम्हाला याबाबत माहितीच नसल्याचं धक्कादायक विधान त्यांनी केले. दुसरीकडे पाण्याच्या प्रदूषणामुळे माशांचा मृत्यू झाला आहे, की पाण्यात औषध टाकून मासेमारी करण्याचा प्रकार काही समाजकंटकांनी केलाय, याची चौकशी करणं गरजेचे ठरले आहे.
गावदेवी तलावात कासवांसह माशांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2021 4:27 AM