विरार : बुधवारी पहाटे चारच्या सुमारास मासेमारीहून अर्नाळा बंदरात परत येत असलेल्या मासेमारी नौकेची दिशा जीपीएस सिस्टीम बिघडल्याने चुकल्याने ती खडकावर आदळून अपघात झाला. या नौकेवर असलेले १७ खलाशी सुखरुप असून नौका मात्र पूर्णपणे मोडल्याने मालकाला मोठे नुकसान सहन करावे लागणार आहे.अर्नाळा गावातील विल्सन पिस्तोल यांच्या मालकीची देवदूत ही मासेमारी नौका १७ खलाशांना घेऊन मासेमारी करून बंदराकडे येत होती. पहाटे चारच्या सुमारास गडद धुके पसरले होते. त्यातच नौकेवरील जीपीएस सिस्टीम बंद पडल्याने नौकेची दिशा चुकली. ही नौका नेमकी रानगाव समुद्रात असलेल्या खडकावर जाऊन आदळली. धडक इतकी जोरात होती की नौका पार मोडून पडली. नौकेवरील सर्व १७ खलाशी सुखरुप रानगाव समुद्रकिनाऱ्यावर आले. अपघाताची खबर मिळताच अर्नाळा बंदरात असलेल्या गस्तीवरील पोलीस स्पीड बोटीने घटनास्थळी पोचले. नौकेलाही समुद्रकिनाऱ्यावर आणण्यात आले. अपघातात नौका पूर्णपणे मोडून पडली असून मालकाला मोठा फटका बसला आहे. दरम्यान, अपघातग्रस्त नौकेचे नुकसान झाल्यास मच्छिमारांना कोणत्याही आर्थिक मदतीची तरतूद नाही. मासेमारी बोट अपघातग्रस्त झाल्यास मालकाला मोठा फटका बसतो. बोट बांधण्यासाठी किमान तीस ते चाळीस लाख रुपये खर्च येतो. पण, अपघातानंतर भरपाई मात्र मिळत नसल्याने एकमेव उदरनिर्वाहाचे साधन गमावून मच्छिमार कुटुंबावर मोठे संकट ओढावते, असे भाजपाचे वसई तालुका अध्यक्ष महेंद्र पाटील यांनी सांगितले.हा धोकादायक खडक नष्ट करण्याची मागणीरानगाव येथे असलेल्या या खडकामुळे अनेक मासेमारी बोटींना अपघात होऊन मोठे नुकसान झाले आहे. तत्कालीन आमदार विवेक पंडित यांनी ६ मे २०१४ रोजी महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पराग जैन यांना पत्र लिहून हा खडक काढण्याची मागणी केली होती. या खडकामुळे मच्छिमारांच्या बोटी अपघातग्रस्त होऊन त्यांचे आर्थिक नुकसान होते. तसेच जिवीत हानी होण्याचा धोकाही पंडित यांनी आपल्या पत्रात व्यक्त केला होता. मात्र, त्यावर बोर्डाकडून कोणतीच कार्यवाही केलेली नाही.अर्नाळा दीपस्तंभाची उंची ६० मीटर करा : अर्नाळा समुद्रकिनारी मासेमारी बोटींना रात्रीच्या वेळी दिशा कळावी यासाठी दिपस्तंभ बांधण्यात आला आहे. मात्र, सध्याच्या दिपस्तंभाची उंची फक्त ३० मीटर आहे. रात्री आणि धुके असताना उंची कमी असल्याने समुद्रात असलेल्या मासेमारी बोटींना दिपस्तंभ दिसून येत नाही. परिणामी अनेकदा दिशा कळत नसल्याने बोटी भरकटत आहेत. यासाठी दिपस्तंभांची उंची वाढवून ती किमान ६० मीटर पर्यंत करण्यात यावी, अशी मागणी पाटील यांनी राज्य सरकारकडे केली आहे.
मच्छीमार नौका फुटली
By admin | Published: April 07, 2016 1:08 AM