मीरारोड - भाईंदरच्या उत्तन येथील पातान बंदर समुद्र किनारी प्रातःविधी साठी गेलेल्या मच्छीमारांवर वीज कोसळून एकाचा मृत्यू झाला तर ६ जण किरकोळ जखमी झाले. यामुळे काही घरातील विजेची उपकरणं बंद पडली तर वीज पुरवठा खंडित झाला होता. स्टॅनी इनास अदमनी ( ६६ ) असे निधन झालेल्या मच्छीमाराचे नाव आहे .
भाईंदर पश्चिमेच्या उत्तन - पाली - चौक परिसरातील बहुतांश मच्छीमार समुद्र किनारी प्रातः विधीसाठी जातात . पातान बंदर येथे राहणारे स्टॅनी देखील घराच्या मागील समुद्र किनारी सवयी प्रमाणे सकाळी साडे सहाच्या सुमारास प्रातःविधीसाठी गेले होते . त्यावेळी अन्य मच्छीमार देखील प्रातःविधी आदी साठी आले होते .
वादळ - विजेचा कडकडाट सुरु असतानाच अचानक प्रचंड आवाज होऊन वीज कोसळली . स्टॅनी यांच्या वर वीज पडल्याने ते जागीच मरण पावले . तर त्या ठिकाणी असलेले रोहन राजेश पोशापीर , गिल्डर खोपटकर , राजेश पिला, सनी पिला आदी जखमी झाले .वीज पडताच सर्वांचा जिवाच्या भीतीने थरकाप उडाला . परंतु पावसाची रिमझिम व किनारा ओला असल्याने काहींना विजेचे झटके बसले . आवाज तर इतका मोठा होता कि कानठळ्या बसल्या . तासभर तर काहींचे कान सुन्न झाले होते .
जखमींना जमेल तसे लगतच्या डॉक्टारां कडे उपचारासाठी नेण्यात आले . मच्छीमार नेते बर्नाड डिमेलो यांनी पोलीस व जिल्हा प्रशासनाला माहिती देत आवश्यक मदतकार्य सुरु केले . तहसीलदार अधिक पाटील यांनी मंडळ अधिकारी व तलाठी यांना घटनेचा आढावा घेऊन शासना कडून शक्य ती मदत करण्याचे निर्देश दिले . उत्तन सागरी पोलीस ठाण्याचे प्रभारी प्रवीणकुमार साळुंके यांनी घटना स्थळाची पाहणी करून अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे .
वीज कोसळल्याने येथील काही घरां मधील विजेची उपकरणं बंद पडली . तर वीज पुरवठा देखील खंडित झाला होता . या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे . उत्तन परिसरातील मच्छीमारांनी समुद्र किनारी उघड्यावर प्रातःविधी साठी जाऊ नये असे आवाहन महापालिकेचे प्रभाग अधिकारी सुदाम गोडसे यांनी केले आहे .