मीरारोड - भाईंदरच्या उत्तन भाटेबंदर येथील एका लहान बोटीतील मच्छीमाराच्या गळाला क्वचित सापडणारा वाघ्या पाकट हा मासा लागला. वाघा सारखा दिसणारा हा वाघ्या पाकट सुमारे शंभर किलो वजनाचा आहे.
भाटे बंदर येथील मच्छीमार सुनील याची विना इंजिनची लहान एकविरा आई नावाची मासेमारी बोट आहे. सुनील व त्याचा भाऊ हे समुद्रातील खडकात मिळणाऱ्या शेवंडया पकडतात तसेच ज्या भागात चिखल असतो तिकडे गळ टाकून मासेमारी करतात. साधी बोट असल्याने किनाऱ्या पासून सकाळी अर्धा एक तास आत जातात व दोन तासात पुन्हा किनारी येतात.
गुरुवारी सुनील व त्याचा भाऊ गळ टाकून मासेमारी करत असताना गळाला भला मोठा वाघ्या पाकट मासा लागला. इतका मोठा मासा आणि तोही क्वचित सापडणारा वाघ्या पाकट मिळाल्याने दोघेही खुश झाले. वाघ्या पाकट शरीरासाठी चांगला मानला जात असल्याने त्याला मागणी सुद्धा आहे.