लोकमत न्यूज नेटवर्कपालघर : राज्यशासनाच्या पर्यावरण विभागाने जिल्ह्यातील पाच धूप प्रतिबंधक बंधाऱ्यांची मान्यता रद्द केल्याचे दुष्परिणाम दिसू लागले असून समुद्रात निर्माण झालेल्या महाकाय लाटाच्या तडाख्याने किनाऱ्यावरील अनेक घरामध्ये पाणी शिरले. शनिवारी दुपारी वर्षभरातील मोठी भरती येवून ५ मिटर्स उंचीच्या लाटा उसळणार असल्याने आपली घरे वाचविण्यासाठी सर्व कुटुंबे मुसळधार पाऊस आणि विजेच्या कडकडाटात मातीच्या गोणीचा बंधारा बांधून आपले संसार वाचविण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत आहेत.पालघर जिल्ह्यातील सातपाटी, नवापूर, एडवण, तारापूर आणि घिवली अशा पाच मच्छिमार गावाच्या किनाऱ्यावर होणारी धूप आणि त्यांच्या घरांना निर्माण झालेला धोका लक्षात घेता पतन विभागा कडून वरील गावात धूप प्रतिबंधक बंधारे बांधण्याचे प्रस्ताव विचाराधीन होते. हवामान खात्याने २३ जून ते २२ सप्टेंबर दरम्यान १८ दिवस धोक्याचे असल्याची माहिती दिली असून सुमारे पाच मीटर्सच्या लाटा उसळणार असल्याचे सांगितले असल्याने या धूप प्रतिबंधक बंधाऱ्याच्या उभारणीची कामे लवकरच हाती घेण्याचा मानस पतन विभागाचा होता. मात्र राज्यशासनाच्या पर्यावरण विभागाने हे पाचही बंधारे बांधण्याच्या प्रस्तावाला ना हरकत पत्र देण्यास नकार दिल्याने या बंधाऱ्याचे काम रखडले आहे.त्यामुळे २३ जून पासून समुद्रात निर्माण झालेल्या तुफानी वादळी लाटांचे तडाखे किनाऱ्यावरील घरे, शेती, बागायतींना बसायला सुरुवात झाली होती. आज दुपारी १२ वाजल्यापासून उधाणाला सुरुवात होणार असल्याने पहाटे ५ वाजल्या पासून किनारपट्टीवरील अनेक घरातील कुटुंबे आपल्या कच्च्या बच्या सह आपली घरे वाचविण्यासाठी मातीच्या गोणी भरून त्या गोणी आपल्या घरापुढे रचण्याचे काम करीत होते. पतन विभागा कडून सातपाटीतील बंधाऱ्याला पडलेली भगदाडे बुजविण्याची कामे मागील काही दिवसापासून सुरू असली तरी आज समुद्राच्या लाटांनी बंधारा ओलांडून मच्छीमारांच्या घरांना तडाखा दिला. सातपाटीमधील क्रांती मंडळ,दांडा पाडा ई. भागातील काही घरात समुद्राचे पाणी शिरले. त्यामुळे सेनेचे मंत्री रामदास कदम ह्यांच्या अखत्यारीत असलेल्या पर्यावरण विभागा कडून जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी नाहरकत दाखले मिळवून घेणे गरजेचे आहे.
मेरीटाईमच्या निर्णयाने मच्छिमारांची घरे झाली उध्वस्त
By admin | Published: June 26, 2017 1:23 AM