ठाणे: हाणामारी करुन तलवारीच्या धाकावर लुटमार तसेच दहशत माजविणा-या ‘टॉप २०’ मधील गुंड जयेश उर्फ जया चंदनशिवे (३१, रा. ज्ञानेश्वरनगर, वागळे इस्टेट, ठाणे) तसेच संजय जती (३८, रा. कोपरी, ठाणे पूर्व), सूर्यप्रकाश यादव (२६, रा. साठेनगर, ठाणे) , रवी सेन (१९) आणि संदीप चौबे (२८) अशा पाच आरोपींना वागळे इस्टेट पोलिसांनी नुकतीच अटक केली आहे. त्यांना पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायायालने दिले आहेत.वागळे इस्टेट, अणाभाऊ साठेनगर येथील रिक्षा चालक सूरज गुप्ता (२४) हे ४ डिसेंबर रोजी रात्री १०.३० वाजताच्या सुमारास रोड क्रमांक २२ येथे पायी फिरण्यासाठी गेले होते. त्यावेळी पूर्ववैमनस्यातून गुंड जयेश उर्फ जया चंदनशिवे याने संजय, सूर्यप्रकाश तसेच रवी आणि संदीप या पाच जणांनी मिळून त्याच्या पाठीवर तलवारीने वार केले. त्यानंतर एका औषधाच्या दुकानात त्यांनी तोडफोड करुन धिंगाणाही घातला होता. जखमी गुप्ताला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दरम्यान, याप्रकरणी हाणामारीसह दंगलीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर या पाचपैकी रवी आणि संदीप यांना ६ डिसेंबर रोजी पोलीस उपनिरीक्षक विनोद लबडे यांनी अटक केली. त्यांना ११ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे. जयेश चंदनशिवे या ‘टॉप २०’ मधील गुंडासह संजय आणि सूर्यप्रकाश या तिघांना ७ डिसेंबर रोजी अटक केली. त्यांना १२ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे. नरेश आणि राहूल बोरडे या त्यांच्या अन्य दोन साथीदारांचा शोध घेण्यात येत असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अफजल पठाण यांनी सांगितले. या टोळीकडून एक लाकडी दांडकेही हस्तगत करण्यात आले आहे. यातील तक्रारदार रिक्षाचालक सूरज गुप्ता हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याचे पोलिसांनी सांगितले.