डोंबिवली : दावडी परिसरात उभ्या राहत असलेल्या रिजेन्सी अनंतम या गृहसंकुलातील ७८ वातानुकूलित यंत्रे चोरट्यांनी लंपास केल्याची घटना घडली होती. याप्रकरणी मानपाडा पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली आहे. त्यांच्याकडून २० वातानुकूलित यंत्रे हस्तगत केली असून, पोलिसांनी २१ लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
रिजन्सी अनंतमध्ये प्रत्येक फ्लॅटमध्ये साधारण तीन वातानुकूलित यंत्रे लावण्याचे काम सुरू आहे. त्यासाठी मोठ्या प्रमाणात गृहसंकुलाच्या प्रत्येक मजल्यावर ही यंत्रे ठेवण्यात आली होती. ७८ यंत्रे गायब असल्याचे २१ ऑगस्टला तेथील सुपरवायझर जितेंद्र शिरसाळे यांच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार केली.
पोलीस उपायुक्त विवेक पानसरे आणि सहायक पोलीस आयुक्त जे. डी. मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली मानपाड्याचे सहायक पोलीस निरीक्षक अविनाश वनवे यांच्या पथकाने या गुन्ह्याचा तपास सुरू केला. तपासात प्राथमिक माहिती उघडकीस आली की, २० ऑगस्टला विनोद महतो हा गृहसंकुलाच्या सुरक्षारक्षकाला भेटला होता. त्यानेच ही चोरी केली असेल. कारण तो काही दिवसांपूर्वी गृहसंकुलात काम करीत होता. नुकतेच त्याने काम सोडले होते. त्याची ओळख असल्याने त्याला कोणी हटकले नाही. अखेर मोबाइल लोकेशनच्या आधारे वनवे यांनी तपासाची सूत्रे फिरविली. या प्रकरणात रहेमान खान आणि दीपक बनसोडे यांनाही ताब्यात घेतले. हे दोघे खासगी कॉल सेंटरमध्ये गाडीचालक आहेत. त्यानंतर पोलिसांनी विनोद महतो, मोहमद रशीद आणि आदील कपूर या तिघांनाही ताब्यात घेतले. या पाचही जणांनी मिळून ही यंत्रे चोरल्याचे चौकशीत स्पष्ट झाले.
----------------------
जास्त पैसे कमाविण्याच्या नादात केला गुन्हा
कमी वेळेत जास्त पैसे कमाविण्याच्या नादात हा गुन्हा केल्याचे उघड झाले आहे. विशेष म्हणजे २० वातानुकूलित यंत्रे पोलिसांनी हस्तगत केली; परंतु उर्वरित यंत्रे आरोपींनी वसईमध्ये उभी राहून फेरीवाल्यांप्रमाणे विकल्याचेही तपासात उघड झाले आहे.
--------------------------