नितिन पंडीत -
भिवंडी - संपूर्ण महाराष्ट्रात १६ ते २१ जुलै दरम्यान झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागात पूर परिस्थिती निर्माण झाली होती. भिवंडीतही अनेक भागांत पुराचे पाणी शिरल्याने अनेक कुटुंबियांचे अतोनात नुकसान झाले. यामुळे आता पूरग्रस्तांना नुकसान भरपाई म्हणून शासनाने प्रति कुटुंब १० हजार रुपये आर्थिक मदत जाहीर केली होती. शासन निर्देशानुसार भिवंडीतील घर, गोठे, झोपड्या, दुकानदार, टपरी वाले, तसेच कुक्कुटपालन शेड, असे सुमारे ८८६३ पंचनामे करून शासनाकडे अहवाल पाठविण्यात आला होता.
शासनाकडून भिवंडी तालुक्यासाठी तब्बल १० कोटी २७ लाख ७७ हजार ७०० रुपयांचा मदत निधी मंजूर झाला असून मंगळवारी ५७१७ नुकसानग्रस्तांच्या बँक खात्यात ५ कोटी २५ लाख ४७ हजार ७५ रुपयांची मदत जमा करण्यात आल्याची माहिती भिवंडीचे तहसीलदार अधिक पाटील यांनी दिली. आमदार शांताराम मोरे यांच्या हस्ते मंगळवारी तहसीलदार अधिक पाटील, जिल्हा परिषद समज कल्याण समिती सभापती प्रकाश तेलीवरे, नायब तहसीलदार गोरख फडतरे यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रातिनिधिक स्वरूपात धनादेशांचे वितरण पूरग्रस्तांना करण्यात आले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पूरग्रस्तांना मदत करतांना जाचक अटी शिथिल करून नुकसानग्रस्तांना सरसकट मदत दिल्या बद्दल शासनाचे जनतेच्या वतीने आमदार शांताराम मोरे यांनी आभार मानले.
तर पुरामुळे घरातील अन्नधान्य, साहित्याचे नुकसान झाले असताना ऐन दिवाळीत आम्हाला शासनाची मदत मिळत असल्या बद्दल पूरग्रस्त बांधव रुपेश मधुकर जाधव यांनी समाधान व्यक्त केले .