किन्हवली : शहापूर तालुक्यातील धरण क्षेत्रात चार दिवस मुसळधार पावसामुळे भातसा धरणाच्या पाणीसाठ्याची पातळी वाढली आहे. त्यामुळे साेमवारी पुन्हा धरणाचे पाचही दरवाजे एक मीटरने उघडण्यात आले. गेटमधून १८ हजार क्युसेस इतका विसर्ग करण्यात आला आहे. यामुळे भातसा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांपैकी महत्त्वाचे समजले जाणारे भातसा धरण पूर्णपणे भरलेले आहे. आतापर्यंत चौथ्यांदा धरणाचे दरवाजे उघडण्यात आले आहेत. धरणाची क्षमता १४१ मीटर एवढी आहे. सध्या ही पातळी १४१.७० मीटर इतकी झाली आहे. भातसा धरण ९९.०६ टक्के भरले असून आज १०४.०० मि.मी. पाउस झाला असून १३ सप्टेंबरला सकाळी भातसा धरणाचे पाच दरवाजे एका मीटरने उघडण्यात आले आहेत. त्यातून १८ हजार क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. भातसा नदीलगतच्या गावांना तसेच शहापूर मुरबाड रस्त्यालगत सापगाव नदी पुलावरून पाणी जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे सावधानतेचा इशारा जलसंपदा खात्याकडून देण्यात आला आहे.
यासंबंधी तातडीचे परिपत्रक उपविभागीय अभियंता, पाटबंधारे विभाग भातसा नगर यांनी काढले आहे. धरणाच्या पाण्याचाही समावेश झाल्याने भातसा नदी धोक्याची पातळी ओलांडण्याची शक्यता ओळखून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. भातसा नदीवरील सापगाव पूल पाण्याखाली जाण्याची भीती असल्याने शहापूर-मुरबाड या मुख्य रस्त्यावरून प्रवास करणाऱ्यांनाही दक्षता बाळगण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
काेट
तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणाचे पाच गेट एका मीटरने उघडण्यात आले असून भातसा नदीच्या काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
- योगेश पाटील, कार्यकारी अभियंता, जलसंपदा तथा पाटबंधारे विभाग, भातसा