डोंबिवली : कोकणकन्या एक्स्प्रेसने प्रवास करणाऱ्या तुर्भे येथील नौशाद अली या प्रवाशाचा रेल्वेतून पडून मृत्यू झाल्याची घटना सोमवारी मध्यरात्री १ वाजताच्या सुमारास दिवा-कळंबोली मार्गावर घडली. या अपघातासंदर्भात दिवा स्थानक प्रशासनाला पहाटे अडीच वाजताच माहिती मिळाली; मात्र रुग्णवाहिका उपलब्ध नसल्याने सकाळी ६ वाजेपर्यंत मृतदेह रेल्वेरुळांवरच पडून असल्याची धक्कादायक माहिती दिवा रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष अॅड. आदेश भगत यांनी दिली.
अपघाताची माहिती आदेश भगत यांना मिळताच त्यांनी लोहमार्ग पोलीस कर्मचाºयांना दिवा स्थानकातून कोकणात जाणाºया जनशताब्दी गाडीने घटनास्थळी जाण्यास सांगितले. त्यानुसार, ते घटनास्थळी गेले. मृतदेह घेऊन ते दिवा-रोहामार्गे पुन्हा दिव्यात आले. त्यानंतर, ठाण्याच्या सिव्हिल रुग्णालयात मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी नेण्यात आला. रुग्णवाहिका नसल्याने दिवा स्थानकात रेल्वे अपघात घडल्यास अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. त्यामुळे तेथे रुग्णवाहिकेची सोय असावी, अशी मागणी अॅड. भगत यांनी केली होती. त्यासाठी मध्य रेल्वेच्या उपनगरीय रेल्वे यात्री उपभोक्ता समितीच्या बैठकीत चर्चाही झाली; मात्र ठोस कारवाई झाली नाही.
सामाजिक संस्थेने दिवा स्थानकात कायमस्वरूपी रुग्णवाहिका उपलब्ध व्हावी, यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. संस्थेने पुढाकार घेतल्यास विभागीय व्यवस्थापकांकडून परवानगी घेण्यासाठी संघटना सहकार्य करेल, असे अॅड. आदेश भगत यांनी सांगितले.