ठाणे : ठाणे जिल्ह्यात रविवारी दोन वेगवेगळ्या दुर्घटनांत बापलेकासह तीन जण बुडाले. पहिल्या घटनेत हिरानंदानी इस्टेट येथील खाडीमध्ये मासेमारीसाठी गेलेले वाघबीळ येथील दोघे बापलेक रविवारी बुडाले. त्यापैकी एक मृतदेह सापडला असून मुलाचा शोध सोमवारी उशिरापर्यंत सुरू होता. तर भातसा नदीत ओझरली गावानजीक ठाण्यातील तीन मित्र बुडाल्याची घटना संध्याकाळी घडली.धर्माचापाडा येथे राहणारे राजेश भोई आणि त्यांचा सात वर्षांचा मुलगा हर्षद रविवारी खाडीत मासेमारीसाठी गेले. त्यांच्यासमवेत पाच-सहा जण होते. पाण्यात शिरल्यानंतर त्यांचे साथीदार पुढे निघून गेले. राजेश यांच्यासोबत त्यांचा मुलगा असल्याने ते या नाल्याजवळ थांबले. या भागातील चिखलात ते अडकले असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.अंधार पडला तरी घरी आल्याने त्यांच्या पत्नीने शोधाशोध सुरू केली. खाडीकडे दोघांचे किनाऱ्यावर काढून ठेवलेले कपडे दिसले. पोलिसांना कळवल्यानंतर ठाणे पालिकेचे अग्निशमन दल आणि प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या मदतीने शोधकार्य सुरू केले. रविवारी रात्री ११.३० वाजेपर्यंत शोधमोहीम सुरू होती. सोमवारी सकाळी राजेश यांचा मृतदेह मिळाला.हट्टामुळे संकटात सापडलाकासारवडवली पोलीस, ठाणे महापालिकेचे अग्निशमन दल आणि प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून चिमुकल्या हर्षदचा शोध सुरू आहे. तो पाण्यात वाहून जाऊन जवळपास २४ तास उलटले. दरम्यानच्या काळात भरतीही येऊन गेली. जेवणासाठी खाडीतून मासे आणणे, हे राजेश भोई यांचे नेहमीचेच काम होते. हर्षद त्याच्या वडिलांना कधीच सोडत नव्हता. तोदेखील वडिलांसोबत नेहमी जायचा. सोमवारी या हट्टानेच तो संकटात सापडला.तीन मित्रांचे मृतदेह सोमवारी आढळलेटिटवाळा : खडवली येथील भातसा नदीकिनारी ओझरली गावानजीक फिरण्यासाठी आलेल्या तीन तरुणांचा पात्रात रविवारी सायंकाळी बुडून मृत्यू झाला.रोशन कामत (३०), सुरज सिंह (३०), राजेश रयटा (३५) अशी त्यांची नावे आहेत. कल्याण तालुका पोलीस आणि कल्याण अग्निशमन दलाच्या जवानांनी त्यांचा शोध घेतला. मात्र, अथक प्रयत्न करूनही ते सापडले नाहीत. सोमवारी सकाळी शोध घेत असताना तिघांचे मृतदेह आढळले.
बापलेकासह पाच बुडाले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2018 1:19 AM