भिवंडी : पालिका आयुक्त डाॅ. पंकज आशिया यांनी मंगळवारी ऑनलाइन झालेल्या विशेष सभेत अर्थसंकल्प सादर केला. स्थायी समितीची मुदत संपून नवीन समिती स्थापन झालेली नसल्याने आयुक्तांनी हा अर्थसंकल्प महापौर प्रतिभा पाटील यांना सादर केला. या अर्थसंकल्पात कोणतीही करवाढ करण्यात आलेली नसल्याने भिवंंडीकरांना काहीसा दिलासा मिळाला आहे. मागील वर्षात कोरोना संकटात महापालिका प्रशासनाला विकासकामांकडे लक्ष देता आले नाही. त्यामुळे या बजेटमुळे शहर विकासाची अनेक कामे मार्गी लागू शकतात. त्याचबरोबर महिला व बालकांच्या आरोग्यावर विशेष लक्ष देण्यात येणार असून शहरात पाच प्रसूतिगृहे उभारणे, रस्ते, कचरा व डम्पिंग ग्राउंडच्या समस्या सोडविण्यासाठी आवश्यक ती तरतूद केल्याचे ते म्हणाले. मनपा कर्मचाऱ्यांच्या सातव्या वेतन आयोगास राज्य सरकारने मंजुरी दिल्यास त्याचीही तरतूद या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे.
भिवंडी महापालिकेचा २०२१ - २२ या आर्थिक वर्षाचा ८१२ कोटी ६३ लाख २१ हजारांचा मूळ अर्थसंकल्प मंगळवारी सादर केला. मागील वर्षाचा २०२० - २०२१ या आर्थिक वर्षाचा ६४० कोटी ८४ लाख ४० हजार रुपयांचा सुधारित अर्थसंकल्पही आयुक्तांनी सादर केला. या वेळी अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे, शिवसेना गटनेते संजय म्हात्रे, नगरसेवक मदन नाईक, उपायुक्त दीपक झिंजाड, उपायुक्त नूतन खाडे, शहर अभियंता लक्ष्मण गायकवाड, मुख्य लेखाधिकारी किरण तायडे, मुख्य लेखा परीक्षक श्रीकांत अनारसे, बांधकाम लेखा परीक्षक काशिनाथ तायडे, नगरसचिव अनिल प्रधान, जनसंपर्क अधिकारी मिलिंद पळसुले उपस्थित होते.
२०२१-२२ या वर्षात महापालिकेला १०८९९.६९ लाख उत्पन्न अपेक्षित आहे. पाणीपुरवठा व मलनिस्सारण, शिक्षण विभाग, वृक्षसंवर्धन, अर्थसंकल्पाचे महसुली उत्पन्न कमी व खर्च अधिक असल्याने अर्थसंकल्पातून पाणीपुरवठा विभागासाठी ६३१०.५२ लाख, शिक्षण ४७१०.३९ लाख, अग्निशमन १२२०.७५ लाख वर्ग करण्यात येणार आहे. मार्केट, पंतप्रधान आवास योजना, अटल आनंद घन वन प्रकल्प, काँक्रीटचे रस्ते तयार करणे, जीआयएस मॅपिंग करणे, शाळा इमारत बांधणे तसेच या महापालिकेचे महसुली उत्पन्न पाहता दोन टक्के इतकी रक्कम म्हणजेच ७८८.१६ लाख इतकी तरतूद नगरसेवक निधीसाठी करण्यात आली आहे.
---------------------------------------------------
विकासशून्य असा अर्थसंकल्प
महिला व बालकल्याण, दुर्बल घटक, दिव्यांग कल्याण यासाठी उत्पन्नाच्या पाच टक्के रक्कम म्हणजेच १२६.५६ लाख इतकी तरतूद केली आहे. अर्थसंकल्पीय सभेचे कामकाज गुरुवारपर्यंत तहकूब करण्यात आल्याचे महापौरांनी जाहीर केल्याची माहिती प्रशासनाने दिली. महापालिकेच्या तिजोरीत खडखडाट असताना विकासशून्य व फुगवलेला अर्थसंकल्प सादर झाला असून यावर नगरसेवक व नागरिक समाधानी नाहीत, अशी प्रतिक्रिया भाजप नगरसेवक नीलेश चौधरी यांनी दिली आहे.