शरद पवारांच्या कार्यकारिणीत अजित पवार गटाची पाच नावे; माहिती न घेता जाहीर?
By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2023 06:26 AM2023-10-24T06:26:24+5:302023-10-24T06:28:00+5:30
राष्ट्रवादी दोन गटात विभागल्याने पदाधिकारी, कार्यकर्ते संभ्रमात, कधी इकडे तर कधी तिकडे अशा द्विधा मनस्थितीत असल्याचे दिसत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे : राष्ट्रवादी शरद पवार गटाने दोन दिवसांपूर्वी जाहीर केलेल्या कार्यकारिणीच्या यादीत चार ते पाच नावे अजित पवार गटाची असल्याचा दावा शहराध्यक्ष आनंद परांजपे यांनी केला. त्यामुळे दोन्ही गट आमने सामने येणार आहेत. परांजपे यांनी सोमवारी ठाणे महापालिका शिक्षण मंडळाचे माजी उपाध्यक्ष शशीधर जाधव यांची राष्ट्रवादी काँग्रेस ठाणे शहर (जिल्हा) उपाध्यक्षपदी, सुनील पाटील यांची ठाणे शहर (जिल्हा) चिटणीसपदी ठाणे शहर जिल्हा सरचिटणीस रवींद्र पालव यांच्या उपस्थितीत नियुक्ती केली.
नव्या यादीवरच अजित पवार गटाने आक्षेप घेतला. यादीत ज्या पदाधिकाऱ्यांना पदे देण्यात आली आहेत. त्यातील काहीजण अजित पवार गटात आधीच सहभागी झाले असून त्यांना महत्त्वाची पदेही देण्यात आल्याचा दावा शहराध्यक्ष परांजपे यांनी केला.
पदाधिकारी संभ्रमात
परांजपे यांनी केलेल्या दाव्यामुळे पदाधिकारी संभ्रमित झाले आहेत. राष्ट्रवादी दोन गटात विभागल्याने पदाधिकारी, कार्यकर्ते हे आजही संभ्रमात आहेत, कधी इकडे तर कधी तिकडे अशा द्विधा मनस्थितीत असल्याचे दिसत आहे. त्यांनाही दोन गट झाल्याचे पचनी पडलेले नाही. परंतु असे असतांना सर्वांना आपलेसे करण्यासाठी आधी अजित पवार गटाने ऑगस्ट महिन्यात कार्यकारिणी जाहीर केली. त्यात अनेकांना संधी दिली, दोन दिवसांपूर्वी जाहीर झालेल्या शरद पवार गटानेही आपली भरगच्च यादी जाहीर केली. परंतु त्यात अजित पवार गटाचे चार ते पाच चेहरे असल्याचा दावा परांजपे यांनी केला.