पंकज रोडेकर ठाणे : राज्यभरात डिसेंबर महिन्यात मौखीक (मुख स्वास्थ) आरोग्य तपासणी मोहिम राबवण्यात आली. त्यामध्ये सुरुवातीला कर्करोग पूर्व लक्षणे असलेल्या रुग्णांचा शोध घेतला. त्या रुग्णांची तपासणी पूर्ण झाली असून त्यामध्ये ठाणे जिल्ह्यात ५जणांना कर्करोग झाल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे. या रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली.राज्य शासनाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या मौखिक आरोग्य तपासणी ही मोहीम १ ते ३१ डिसेंबर दरम्यान हाती घेतली होती. त्यामध्ये ३० वर्षावरील स्त्री व पुरूषांची तपासणी केली. त्यामध्ये, प्रत्यक्ष २ लाख ६० हजार, अप्रत्यक्ष २ लाख ३५ हजार लोकांची अशी ४ लाख ९५ हजार लोकांची तपासणी केली. ही आकडेवारी ग्रामीण आणि शहरी भागातील असून त्या केलेल्या तपासणीत अंदाजे ५ हजार लोकांना कर्करोग पूर्व लक्षणे असल्याचा संशय वर्तवला गेला होता. त्यांची विशेष तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली विविध योजनेंतर्गत केलेल्या दुसऱ्या टप्पातील तपासणीत ४५० जणांमध्ये कर्करोगाची लक्षणे दिसत असल्याचे पुढे आले होते. त्यामुळे त्यांच्यावर द्वितीय पूर्ण तपासणी केल्यावर त्यामध्ये ७ जणांना कर्करोग असल्याची दाट शक्यता दिल्याने त्यांची बॉयोप्सी केली. त्यामध्ये ५ जणांना कर्करोग झाल्याचे आता स्पष्ट झाले आहे.मौखीक आरोग्य तपासणीत सुमारे पाच हजार जणांमध्ये कर्करोग पूर्व लक्षणे आढळून आले होते. त्यापैकी ५ जणांना आता कर्करोग झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. पण, ज्या ४५० जण संशयित म्हणून पुढे आले आहेत. त्यांचीही यापुढे नियमित तपासणी केली जाणार आहे. - डॉ. बी. सी. केम्पीपाटील, जिल्हा शल्यचिकित्सक ठाणे
मौखिक तपासणीदरम्यान सापडले कर्करोगाचे पाच रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2018 2:36 AM