ठाणे: निवडणूक आचारसंहिता पथकाने शीळ महापे रोडवरून शनिवारी पहाटे १.३० वाजताच्या सुमारास एका कारमधून ब्लँक फायर करणारे (गोळीबाराऐवजी केवळ आवाज करणारे) पिस्टल आणि सात ब्लँक काडतुसासह एक चॉपर जप्त केले. याप्रकरणी नागेश कुसकर (३१), सर्वेश किनळेकर (२२), अक्षय लष्कर (२२), सुबोध कदम (२३) आणि राजू मोरे (४२, सर्व रा. डोंबिवली) या पाच जणांना अटक केली आहे. त्यांना २२ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.आवाजाबरोबर केवळ आग निर्मिती करणारे हे पिस्टल आहे. निवडणुकीच्या काळात कोणतेही शस्त्र बाळगण्यास पोलीस आयुक्तांची मनाई आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता पथकाकडून २० एप्रिल रोजी पहाटेच्या सुमारास संशयास्पद वाहनांची शीळ महापे रस्त्यावर तपासणी करण्यात येत होती. महापे येथून कल्याण फाटयाकडे निघालेल्या एका कारचीही या पथकाने तपासणी केली. तेंव्हा कारच्या मागील सीटच्या उजव्या बाजूस एक लोखंडी चॉपर मिळाला. त्यापाठोपाठ चालक सीटच्या दरवाजाच्या कप्यात एक विदेशी बनावटीचे पिस्टलही मिळाले. त्याबाबत कारमधील किनळेकर यांच्यासह कोणीही समाधानकारक उत्तरे दिली नाही. त्यामुळे या कारसह ही शस्त्रसामुग्रीही जप्त करण्यात आली. एक लाख ६५ हजार रुपयांचे हे पिस्टल असून एक हजार रु पयांची सात काडतुसे आहेत. भरारी पथकाच्या प्रमुखाने दिलेल्या तक्र ारीनंतर शीळ डायघर पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा दाखल केल्याची माहिती सूत्रांनी दिली. नागेश याची ही पिस्टल असून त्याने एका कंपनीकडून कायदेशीररित्या खरेदी केल्याचा दावा केला आहे. अर्थात, निवडणुकीच्या काळात ती जवळ बाळगण्याला मनाई आहे. आरोपी वाढिदवसाच्या कार्यक्र मासाठी जात होते. मात्र, उशिर झाल्याने पुन्हा परतत असताना ते आचारसंहिता पथकाच्या तावडीत सापडल्याची माहिती पोलिसांनी दिली.