ठाणे : ठाणे जिल्हा व सत्र न्यायालयाने पाच जणांना मोक्काअन्वये आणि इतर गुन्ह्यांत पाच वर्षे कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. ही शिक्षा त्यांनी स्वतंत्ररीत्या भोगावयाची असून हा निर्णय न्यायालयाने शुक्रवारी सुनावला.प्रकाश ऊर्फ पापा धोंडू सुर्वे (४२), विजय लक्ष्मण जाधव (२८), निरंजन कृष्णा पुजारी (२५), सुरेश दत्तात्रेय चौधरी (२४) आणि लखन ऊर्फ लक्ष्मण भुवनेश्वर नाईक (२४) अशी शिक्षा झालेल्या त्या पाच आरोपींची नावे आहेत. त्यांच्याविरोधात डिसेंबर २००७ मध्ये श्रीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. त्यानुसार, निरंजन आणि सुरेश या दोघांना डिसेंबर २००७ मध्ये अटक झाली होती. तर, उर्वरित तिघांना २००८ साली अटक केली होती. याचदरम्यान,त्यांना मोक्का लावण्यात आला. हे प्रकरण ठाणे जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश भैसारी यांच्या न्यायालयात आल्यावर त्या पाच जणांना दोषी ठरवून शुक्रवारी शिक्षा सुनावली. यामध्ये त्या पाच जणांना भादंवि ३०७ करिता पाच वर्षे कारावास व पाच हजार रुपये दंड, ३८७ करिता तीन वर्षे कारावास व ५०० रुपये दंड, १२० (ब) करिता तीन वर्षे कारावास व ५०० रुपये दंड, ५०६ (२) करिता एक वर्ष कारावास आणि मोक्का कायद्यान्वये प्रत्येकी पाच लाख रुपये दंड आणि लक्ष्मण नाईक यास तीन वर्षे कारावास व १०० रुपये दंड अशी शिक्षा सुनावली आहे. ही शिक्षा त्यांना स्वतंत्ररीत्या भोगावयाची असल्याचेही म्हटले असले, तरी सर्वाधिक शिक्षा पाच वर्षांची असल्याने तीच त्यांना भोगावी लागणार आहे. याप्रकरणी वागळे इस्टेट विभागाचे तत्कालीन सहायक आयुक्त भीमराव कृष्णाजी सोनावणे आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी देशमुख यांच्या पथकाने तपास केला होता.
पाच जणांना मोक्काअन्वये आणि इतर गुन्ह्यांत पाच वर्षे कारावासाची शिक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2017 2:54 AM