ठाणे : मुलीचे प्रेमसंबंध अमान्य असलेल्या मुलुंडमधील राजेंद्र प्रसाद तिवारी या पित्याने तिचा प्रियकर सुरेंद्र मिश्रा (२६, रा. दिवा) याचे नियोजनबद्ध अपहरण करून त्याला धावत्या लोकलमधून फेकून देऊन हत्या केल्याचा गुन्हा ठाणे गुन्हे शाखेने उघडकीस आणून पाच जणांना अटक केली. याप्रकरणी तरुणाचे अपहरण झाल्याचा गुन्हा जुलै महिन्यात नौपाडा पोलीस ठाण्यात दाखल होता. रेल्वे अपघातात बेवारस म्हणून नोंद असलेल्या त्या तरुणाचे पार्थिव कुटुंबाच्या हाती लागण्यापूर्वीच त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. तसेच त्याचा फोटो आणि काही वस्तूंवरून त्याची ओळख पटवल्याचे पोलिसांनी सांगितले.मूळ उत्तर प्रदेशचा असलेला मयत सुरेंद्र मिश्रा (२६) हा दिव्यात राहत होता. त्याचे मुलुंड येथे राहणारे मुख्य आरोपी राजेंद्र तिवारी यांच्या मुलीशी प्रेमसंबंध होते. ते आरोपीला मान्य नव्हते. त्यामुळे त्याने चार साथीदारांना हाताशी धरून नियोजनबद्ध कट रचून सुरेंद्र याला रूम दाखवतो, असे सांगून ठाण्यात बोलवले. त्यानंतर, त्याचे अपहरण क रून त्यास मुलुंड येथे नेऊन हात बांधून मारहाण केली. तसेच त्याला गावी जाण्यास सांगून कल्याण येथे सोडण्याच्या बहाण्याने मुलुंड येथून कसारा लोकलच्या लगेज डब्यामध्ये ते बसले. नंतर, वासिंद आणि आसनगाव स्टेशनदरम्यान जीवे मारण्याच्या उद्देशाने त्याला लोकलमधून खाली फेकून दिले. तसेच मुख्य आरोपी तिवारी हा दुबई येथे निघून गेला होता. याचदरम्यान, मिश्रा याच्या अपहरणाचा तपास ठाणे गुन्हे आणि नौपाडा पोलीस करत असताना बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीनुसार भास्कर नारायण नारंगीकर आणि रवी अशोक चौधरी या दोघांना वेगवेगळ्या दिवशी अटक केली.
तरुणाची हत्या करणाऱ्या पाच जणांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 09, 2018 2:40 AM