मुंब्रा : मुंब्य्रातील सम्राटनगर भागातील प्रियंका अपार्टमेंट ही तळ अधिक पाच मजली इमारत बाजूला असलेल्या नाल्याच्या दिशेने झुकल्याचे मंगळवारी रात्री निदर्शनास आले. यामुळे ही संपूर्ण इमारत तसेच तिच्यासमोर असलेली बेकरी आणि बाजूच्या गणेश अपार्टमेंट या इमारतीमधील दोन खोल्या सुरक्षेसाठी रिक्त केल्या आहेत.
बारा वर्षांपूर्वी बांधलेल्या या इमारतीच्या तळ मजल्यावर एक दुकान असून, आठ कुटुंबे त्यामध्ये राहत होती. सर्व कुटुंबांची विविध ठिकाणी राहण्याची तात्पुरती व्यवस्था केली आहे. झुकल्यामुळे अतिधोकादायक झालेली ही इमारत तोडण्यात येणार असून ठामपा प्रशासनाने त्यादृष्टीने कारवाई सुरू केली आहे.ही इमारत बांधणाऱ्या विकासकाचे निधन झाले आहे. इमारत बांधताना त्याने योग्य प्रमाणात इमारतीची पायाभरणी केली नाही, यामुळे अल्पावधीतच ती कमकुवत बनून एका बाजूला झुकली असल्याची माहिती उपनगर अभियंता धनंजय गोसावी यांनी दिली.