ठाणे : ठाण्यात बुधवारी मराठा समाजाने पुकारलेल्या बंद दरम्यान उसळलेल्या दंगलीच्या तपासासाठी पाच पथकांची निर्मिती करण्यात आली आहे. वागळे इस्टेट पोलीस ठाण्यांतर्गत दाखल गुन्हयात आणखी सात तर नौपाडयात पाच जणांना अटक झाल्याने या प्रकरणातील एकूण अटक आरोपींची संख्या ४८ झाली आहे.नितिन कंपनीजवळ मोठया प्रमाणात दंगल उसळली. यात पोलीस निरीक्षक सिताराम वाघ यांच्यासह चार अधिकारी आणि तीन कर्मचारी असे सात पोलीस जखमी झाले. तर तीन पोलीस वाहनांसह ३० ते ३५ वाहनांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले. याप्रकरणी नौपाडा पोलिसांनी गुरुवारी शिवसेनेचे माजी नगरसेवक तथा विद्यमान नगरसेविका निर्मला कणसे यांचे पती शरद कणसे आणि शिवसेना शाखाप्रमुख अशोक कदम यांच्यासह २३ जणांना तर वागळे इस्टेट पोलिसांनी राजेश बागवे या मनसे पदाधिकाऱ्यासह १३ जणांना गुरुवारी अटक केली. नौपाडा पोलिसांच्या मदतीला मुंब्रा, कळवा, डायघर आणि ठाणेनगर या चार पोलीस ठाण्यांची चार वेगवेगळी पथके देण्यात आली आहेत. तर वागळे इस्टेट पोलिसांच्या मदतीला श्रीनगर आणि ठाणेनगर पोलीस ठाण्यांची कुमक देण्यात आली आहे. कोणालाही नाहक त्रास होणार नाही, यासाठी संशयितांची आधी संपूर्ण चौकशी करुन पडताळणी करुन मगच अटकेची कारवाई करण्याचे आदेश पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी दिले आहेत. त्यानुसार अनेक सीसीटीव्हींची पडताळणी, माहितगारांकडून चौकशी अशा अनेक मार्गांनी हा तपास करण्यात येत आहे. वागळे इस्टेट पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अफजल पठाण, सिताराम वाघ आणि गायकवाड यांच्या पथकाने शुक्रवारी याप्रकरणी अल्पेश महाडीक (२३), ज्ञानदीप जाधव (१९), उदय दशरथी(१९), शाम सूर्यवंशी (२४), विनोद यादव (२३), निलेश गांगडे (४०) आणि दिलीप पाटील (५४) या सात जणांना अटक केली आहे. सरकारी कर्मचाºयांवर हल्ला करण्यासह दंगल माजविण्याच्या कलमांखाली त्यांना अटक केल्याचे पोलिसांनी सांगितले.नौपाडा पोलिसांनी शुक्रवारी रविंद्र घोरपडे (२२), संदेश मोरे (२४), उमांकात यादव (३३), गजेंद्र सावंत (४९) आणि गजानन कदम (५३) या पाच जणांना अटक केली. त्यामुळे नौपाडयातील अटक आरोपींची संख्या आता २८ झाल्याने एकूण अटकेतील आरोपी ४८ च्या घरात गेल्याची माहिती सूत्रांनी दिली.
ठाण्यातील दंगल प्रकरणाच्या तपासासाठी पोलिसांची पाच पथके
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2018 4:47 AM