डोंबिवली: दिवा शहरात ०४ ऑगस्टला पडलेल्या मुसळधार पावसामुळे तसेच धरणांमधून पाण्याचा विसर्ग झाल्याने संपूर्ण दिवा शहर जलमय झाले होते. दिवा शहरातील असंख्य चाळी तसेच घरांमध्ये सात ते आठ फूट पाणी शिरल्यामुळे नागरिकांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले होते. ठाणे महानगरपालिकेकडून दिव्यातील नागरिकांना तुटपुंजी मदत मिळाली मात्र असंख्य नागरिक त्या मदतीपासून वंचित राहिले. त्यामुळे आज दिवा शहरातील पाच हजार पूरग्रस्तांना आज आमदार सुभाष भोईर यांच्या वतीने 'शिवसहाय्य' मदतकार्य करण्यात आले.
दिवा शहरातील दिवा गाव, बंदर आळी, कोकण रत्न, यशवंत नगर, सुरेश नगर, शिवशक्ती नगर, सिद्धिविनायक गेट, बी. आर. नगर, रिलायन्स टॉवर, नारायण भगत नगर,नाईक नगर, खासदार कार्यालय साबे परिसरात विविध जीवनावश्यक साहित्याचे वाटप करण्यात आले. त्याचा मोठ्या प्रमाणावर लाभ नागरिकांनी घेतला. जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे व आमदार सुभाष भोईर आणि जिल्हाप्रमुख सदानंद थरवळ, विधानसभा संघटक ब्रम्हाशेठ पाटील, क्रीडा सभापती अमर पाटील, नगरसेवक शैलेश पाटील, माजी उपमहापौर शरद गंभीरराव, युवासेना युवा अधिकारी सुमित सुभाष भोईर यांच्या हस्ते मदतकार्याचे वाटप करण्यात आले.
शिवसहाय्य मदतकार्याद्वारे प्रत्येक व्यक्तीला तांदूळ, डाळ, पीठ, तेल, मीठ, साखर, चहा पावडर, मसाला, हळद, खोबरेल तेल, साबण, चटई, टॉवेल इत्यादी साहित्य पुरविण्यात आले. शिवसहाय्य मदतकार्याद्वारे दिवा विभागातील नागरिकांना मदतकार्य करीत असताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे व युवासेना प्रमुख आदित्यजी ठाकरे आणि ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या आदेशानुसार दिवा विभागातील पूरग्रस्त नागरिकांना मदतीचा हात देण्याचा उद्देश होता. शिवसेना नेहमीच संकटकाळात मदतकार्य करण्यासाठी पुढाकार घेत असते व मी दिवा गावचा भूमिपुत्र असल्याने दिवा विभागातील नागरिकांना मदत मिळण्यासाठी पुढाकार घेतला अशी आमदार सुभाष भोईर यांनी प्रतिक्रिया दिली.