कल्याण : विनामास्क तसेच विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांवर केडीएमसी आणि पोलिसांकडून संयुक्त कारवाई सुरू आहे. बुधवारी विनामास्क फिरणाऱ्या १३० नागरिकांवर कारवाई करून त्यांच्याकडून एकूण ६५ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला, तर विनाकारण फिरणाऱ्या ६२५ जणांची अँटिजन चाचणी करण्यात आली. यात चाचणीअंती चारजण कोरोनाबाधित आढळून आले. याआधी रविवारी केलेल्या कारवाईत एक जण आढळल्याने आतापर्यंत विनाकारण फिरणाऱ्यांमध्ये पाचजण कोरोनाबाधित असल्याचे या कारवाईतून उघड झाले आहे.
कोरोना रोखण्यासाठी लॉकडाऊन लागू असतानाही काही ठिकाणी होत असलेली गर्दी पाहता केडीएमसीचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी विनाकारण फिरणाऱ्यांवर कठोर कारवाईचे आदेश मनपा अधिकारी आणि पोलिसांना शनिवारी दिले आहेत. त्यानुसार शनिवारी सायंकाळपासून कारवाईला प्रांरभ झाला आहे. मनपा हद्दीतील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता नागरिकांनी शक्यतो कामाशिवाय बाहेर फिरू नये, बाहेर सार्वजनिक ठिकाणी वावरत असताना न चुकता मास्क घालावा आणि कोरोनाविरुद्धच्या लढ्यात सहकार्य करावे, असे आवाहन मनपाने केले आहे.
दरम्यान, विनाकारण फिरताना आढळलेल्या कोरोनाबाधित पाच जणांपैकी चाैघांना महापालिकेच्या विलगीकरण केंद्रात दाखल केले आहे, तर एक रुग्ण गृहविलगीकरणात आहे.
---------------