नितीन पंडित, लोकमत न्यूज नेटवर्क, भिवंडी : भिवंडीत वाहन चोरीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली असतानाच शुक्रवारी एकाच दिवसात शहरातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये चार दुचाकींसह एक टेम्पो अशी पाच वाहने चोरी झाल्याची नोंद करण्यात आली आहे.
पहिल्या घटनेत नागाव गुलजार नगर परिसरात राहणारे मोहम्मद मुस्तफा अब्दुल मजीद शेख वय ६२ वर्ष यांनी त्यांचे दुचाकी मोटरसायकल १७ नोव्हेंबर ते १८ नोव्हेंबर यादरम्यान गुलजार नगर परिसरात पार्क करून ठेवली असता अज्ञात चोरट्याने चोरून नेली. या प्रकरणी शांतीनगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
'दुसऱ्या घटनेत विश्वनाथ विजय पाटील वय २५ वर्ष रा. वराळदेवी मंदिर, मानसरोवर रोड यांनी त्यांची मोटरसायकल शुक्रवारी वराळदेवी मंदिर येथील सर्विस सेंटर जवळ पार्क करून ठेवली असता अज्ञात चोरट्याने चोरून नेली या प्रकरणी विश्वनाथ पाटील यांनी भिवंडी शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
तिसऱ्या घटनेत जितेंद्र रमेश मिश्रा वय ३१ वर्ष रा. टेमघर पाईपलाईन यांनी त्यांची दुचाकी त्यांच्या राहत्या इमारतीच्या खाली पार्क करून ठेवली असता अज्ञात चोरट्याने चोरून नेली. या प्रकरणी जितेंद्र मिश्रा यांनी शांतीनगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
चौथ्या घटनेत पृथ्वी श्रीनिवास श्रीमले वय २४ वर्ष यांनी त्यांची दुचाकी भिवंडी बस स्थानकाच्या बाजूला असलेल्या उड्डाणपुलाखाली पार्क करून ठेवले असता अज्ञात चोरट्याने चोरून नेली. याप्रकरणी निजामपुरा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तर पाचव्या घटनेत नवनाथ तुकाराम सोबले वय ३७ वर्ष रा.घनसोळी नवी मुंबई,यांनी त्यांचा दोन लाख रुपये किमतीचा अशोक लेलँड कंपनीचा टेम्पो दापोडा येथील श्रीराम कंपाऊंड येथे पार्क करून ठेवला असता अज्ञात चोरट्याने चोरून नेला. याप्रकरणी नवनाथ यांनी नारपोली पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.