ठाणे : येत्या १० दिवसात ठाणे जिल्ह्यातील रस्त्यांवरील खड्डे भरले गेले नाहीत, तर संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल आणि रस्त्यावरील टोल बंद केले जातील, अशा शब्दांमध्ये ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावले. ठाणे आणि रायगडमध्ये जिल्ह्यांमधील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे सर्वसामान्य नागरिकांनाच नव्हे, तर राजकीय नेत्यांनाही मनस्ताप सहन करावा लागत आहे. खड्ड्यांमुळे ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सत्ताधाऱ्यांची गोची झाली आहे. सोशल मीडियावर याचे पडसाददेखील उमटू लागले आहेत. याच पार्श्वभूमीवर ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, रायगड आणि पालघरचे पालक मंत्री रविंद्र चव्हाण यांनी ठाणे जिल्हाधिकारी नियोजन भवनात तिन्ही जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभाग, एमएमआरडीए, एमएसआरडीसी, वाहतूक पोलीस विभाग, परिवहन विभाग, सिडकोच्या अधिकाऱ्यांची तातडीची बैठक बोलावली. पुढील १० दिवसात रस्त्यांवरील खड्डे भरा. अन्यथा कारवाईला सामोरे जा, असा इशारा दोन्ही पालकमंत्र्यांनी यावेळी उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांना दिला. रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे लोक शिव्या घालत आहेत. विरोधक आमच्या फोटोचे बॅनर लावत आहेत. आता हे सहन केलं जाणार नाही. आम्ही निधी आणून द्यायचं काम केलं आहे. त्यानंतर पुढील कामं तुम्ही करायला हवी होती. मात्र तुम्ही ती केली नाहीत. आता पुढील १० दिवसात रस्यांवरील खड्डे बुजवा. अन्यथा कारवाईला सामोरे जा, असा इशारा शिंदे आणि चव्हाण यांनी दिला. २८ फेब्रुवारी २०२० या दिवशी कल्याण पत्री पुलाचं काम पूर्ण होणार असून याच दिवशी पत्री पूल वाहतुकीसाठी खुला केला जाणार असल्याची माहितीदेखील संबंधीत अधिकाऱ्यांनीनी बैठकीत दिली. डोंबिवली पूर्व-पश्चिमेला जोडणारा १२ मीटरचा उड्डाण पूल गेल्या अनेक महिन्यांपासून बंद आहे. हा पूल आता २५ मीटरचा करण्यात येणार असून यासाठी ३० कोटी रुपयांचा निधी मंजूर करुन घेतल्याची माहिती डोंबिवलीचे आमदार आणि रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी दिली. लवकरच कोपर पुलाच्या कामालादेखील सुरुवात होईल, असंदेखील त्यांनी सांगितलं.
...तर १० दिवसांनंतर टोल बंद करू; एकनाथ शिंदेंचा अधिकाऱ्यांना इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2019 4:32 PM