केंद्राकडून आलेल्या या प्रारूप अधिसूचनेनंतर राज्य शासनाने यावर हरकती आणि सूचना मागवून अंतिम अधिसूचना मंजुरीसाठी ती केंद्र सरकारकडे पाठविली आहे. परंतु, त्यावर अद्यापही निर्णय न झाल्याने त्याचा फटका ठाण्याच्या विकासाला बसला आहे.
फ्लेमिंगोमुळे ठाण्यातील ठाणे पूर्व येथून ते घोडबंदरच्या सूरज वॉटर पार्कपर्यंतचा परिसर यात येत आहे. त्यातही कोपरीचा काही भागच यात जात असून त्या ठिकाणी कोणत्याही स्वरूपाचे बांधकाम केलेले नाही. परंतु, असे असेल तरी या निर्णयामुळे थेट १० कि.मी.च्या भागाला फटका बसला आहे. त्यामुळे २०१८ पासून सुरू झालेल्या या पट्ट्य़ातील तब्बल ३५ हून अधिक प्रकल्पांना याचा फटका बसल्याची माहिती पालिकेच्या वरिष्ठ सूत्रांनी दिली. त्यात अनेक नामवंत विकासकांच्या गृहप्रकल्पांसह काही नव्या विकासकांना आपले प्रकल्प मार्गी लावायचे आहेत.
महापालिकेला ४०० कोटींचा फटका
या नियमाचा अडसर विकासकांना जसा ठरत आहे, तसा ठाणे महापालिकेलादेखील फटका बसला आहे. कोरोनामुळे पालिकेची तिजोरी रिती झाली आहे. त्यात मागील दोन वर्षांपूर्वी शहर विकास विभागाने विक्रमी वसुली केली होती. मागीलवर्षी यामुळेच शहर विकास विभागास २६० कोटींचे उत्पन्न मिळाले होते. मात्र, यंदा आतापर्यंत केवळ ७७ कोटींचेच उत्पन्न मिळू शकले आहे. या नियमामुळे तब्बल ४०० कोटींचा फटका बसल्याने महापालिकेच्या उत्पन्नावर त्याचा परिणाम झाला आहे.