ठाणे : परतीच्या पावसाचा परिणाम भाज्यांप्रमाणे फुलांवरही झाला आहे. त्यामुळे दरवर्षी दिवाळीच्या तोंडावर वाढणारे फुलांचे दर यंदा मात्र सर्वसाधारण आहेत. यंदा मालाला दर्जा नसल्याने फुलांचे दर फार वाढलेले नसल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.सण - उत्सव, समारंभाचे वातावरण प्रसन्न करण्यासाठी फुलांची आवश्यकता असते. गणेशोत्सव, नवरात्रौत्सव, दिवाळी, दसरा या सण - उत्सवांत फुलांची खरेदी मोठ्या प्रमाणात केली जाते. यानिमित्ताने एरव्हीपेक्षा फुलांचे दरही तिप्पट - चौपट होतात. ते वधारले तरी फुलांची मागणी मात्र कायम असते. दिवाळीच्या तोंडावर विविध प्रकारांची फुले बाजारात दाखल झाली आहेत. परंतु, परतीच्या पावसाने त्यांच्या दर्जावर मात्र पाणी फेरले. गतवर्षीच्या तुलनेत यंदाच्या दिवाळीत फुलांचे दर सर्वसाधारण आहेत. पावसामुळे मालाला दर्जा नाही, फुले माल भिजलेली येत आहेत. आजची फुले ही उद्या लगेच खराब होऊ शकतात. त्यामुळे फार महागड्या दरात ती विकली जात नसल्याचे विक्रेते संजय ठसाळे यांनी लोकमतला सांगितले. बुधवारी नरक चतुर्दशी असल्याने मंगळवारी ठाणेकरांनी फुलांची खरेदी केली. लक्ष्मीपूजनच्या दिवशी दुप्पट गर्दी होईल, असा अंदाज ठसाळे यांनी व्यक्त केला. ठाण्याचा बाजार फुलांनी बहरला असला तरी मालाचा दर्जा खालावला असल्याने विक्रेत्यांमध्ये नाराजी आहे. दिवाळीच्या निमित्ताने मंगळवारी तब्बल ५० हजारांहून किलो अधिक फुलांची आवक झाल्याचे ठसाळे म्हणाले.
परतीच्या पावसामुळे घसरला ओल्या झालेल्या फुलांचा दर्जा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2017 6:24 AM